NCB – ‘माझ्या पार्टीत ड्रग्ज नव्हते’; क्षितिज रवि प्रसाद व अनुभव चोप्राला ओळखत नाही- करण जोहर

ड्रग्ज प्रकरणी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याची चौकशी होण्याची शक्यता आहे. २८ जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे एनसीबी करणची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, ‘माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते’, असं स्पष्टीकरण करण जोहरने दिलं आहे. करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
“माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. आमच्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणण्यात आलेच नव्हते आणि कोणी त्याचं सेवनही केलं नव्हतं. धर्मा प्रोडक्शनविषयी माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी येत आहेत. तसंच क्षितिज रवि प्रसाद व अनुभव चोप्रा या दोन व्यक्तींचा आणि धर्मा प्रोडक्शनचा संबंध जोडण्यात येत आहे. त्यांचा आणि माझा किंवा धर्मा प्रोडक्शचा कोणताच संबंध नाही. तसंच मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतदेखील नाही. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रोडक्शनला काही घेणं-देणं नाही”, असं करण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मी ड्रग्सचं सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही”. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी क्षितिज रवि प्रसाद आणि अनुभव चोप्रा ही दोन नावं समोर आली आहेत. त्यामुळे शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसह धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माते क्षितिज रवी प्रसाद यांचीदेखील एनसीबीने चौकशी केली.
दरम्यान, करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दीपिका, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहीद कपूर, मलायका अरोरा यांच्यासहित अनेक सेलिब्रेटी पार्टीत उपस्थित होते. पार्टीत हजेरी लावलेल्या सर्व सेलिब्रेटींना एनसीबीकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: