NCB ने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची चार तास केली चौकशी

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) चौकशी मालिका सुरुच असून शुक्रवारी सिनेअभिनेत्री रकुल प्रीत सिंग चार तास आणि सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची सहा तास चौकशी करण्यात आली. करिश्माला शनिवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले असून दीपिका पदूकोणसोबत तिची समोरासमोर चौकशी होणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी धर्मा प्रोडेक्शनचे मॅनेजर क्षितीत रवी यांचीही या अधिकार्‍यांनी चौकशी करुन त्यांच्या वर्सोवा येथील घरी छापा टाकला होता, मात्र या छाप्यात या अधिकार्‍यांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास दरम्यान बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीने पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत नंतर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवतीसह इतर ड्रग्ज पेडलर अशा बाराजणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून बॉलीवूडच्या काही सिनेअभिनेत्रींचे नाव समोर आले होते, त्यात रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, दीपिका पदूकोणसह इतरांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी समन्स मिळताच रकुल ही एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली होती. यावेळी तिची तब्बल चार तास चौकशी झाली, या चौकशीतून तिने अनेक खुलासे केले आहे. मात्र आपण ड्रग्ज घेत नसल्याची कबुली दिली आहे.

दिपीकाची मॅनेजर करिश्मा हिचीदेखील या अधिकार्‍यांनी शुक्रवारी सहा तास चौकशी केली. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र तिनेही तपासात अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे बोलले जाते. करिश्माला शनिवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. त्यात शनिवारी दीपिका हीदेखील चौकशीसाठी हजर राहणार आहे. त्यामुळे करिश्मा आणि दिपीकाची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. करिश्माच्या जबानीवरुन दीपिकाची एनसीबी चौकशी करणार आहे. दीपिकासाठी खास एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. 2017 साली काही अभिनेत्रींमध्ये ड्रग्जविषयी काही चॅट झाले होते. ते चॅट एनसीबीला मिळाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: