बनावट सौंदर्यप्रसाधनांवर एफडीएचा बडगा; लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
सातारा : राज्यात भेसळयुक्त आणि बेकायदेशीर उत्पादनांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अधिक वेग देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेकडे मोर्चा वळवला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत बनावट, भ्रामक दावे करणारी आणि नियमांचे उल्लंघन करून विक्री केली जाणारी सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणावर आढळून आली. या कारवाईत एकूण ३४.६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कराडमध्ये सर्वाधिक कारवाई
सातारा जिल्ह्यातील कराड येथे एफडीएच्या पथकाने छापा टाकून २९.४५ लाख रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला. तपासणीदरम्यान अनेक उत्पादनांवर आवश्यक माहितीच नसल्याचे उघड झाले. काही उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि उत्पादकाचे नाव नमूद करण्यात आले नव्हते, तर काहींवर परवाना क्रमांक असला तरी उत्पादकाची संपूर्ण माहिती अनुपस्थित होती.
एफडीएच्या प्राथमिक तपासानुसार अशा प्रकारची लेबलिंग ग्राहकांची दिशाभूल करणारी असून संबंधित उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरातही एफडीएने तपासणी मोहीम राबवली. महिला ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या बाजारात १.२० लाख रुपयांची भ्रामक दावे करणारी उत्पादने जप्त करण्यात आली.
या उत्पादनांमध्ये स्तनांचा आकार वाढवण्याचा दावा करणारी उत्पादने, शरीराचा आकार अधिक आकर्षक करण्यासाठी विकली जाणारी सौंदर्यप्रसाधने तसेच चरबी कमी करण्याचे आश्वासन देणारी उत्पादने आढळली. मात्र या उत्पादनांच्या प्रभावाबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा आवश्यक मान्यता उपलब्ध नसल्याने एफडीएने त्यांच्यावर कारवाई केली.
अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रकारची उत्पादने ग्राहकांच्या भावनांचा आणि सौंदर्याविषयीच्या अपेक्षांचा गैरफायदा घेत बाजारात विकली जात आहेत.
एफडीएच्या कारवाईचा आणखी एक मोठा टप्पा म्हणजे मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे टाकण्यात आलेला छापा. येथे आवश्यक परवान्यांशिवाय सौंदर्यप्रसाधने आणि काही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले.
या ठिकाणाहून कच्चा माल, उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि तयार मालासह ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान काही उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि उत्पादन प्रक्रियेबाबतही गंभीर अनियमितता समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सौंदर्यप्रसाधनांनी निश्चित गुणवत्ता मानके पूर्ण करणे आवश्यक असते. उत्पादनांची निर्मिती, पॅकिंग, लेबलिंग आणि विक्री यासाठी कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक उत्पादक आणि विक्रेते या नियमांकडे दुर्लक्ष करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
विशेषतः शरीरयष्टी सुधारण्याचे, वजन कमी करण्याचे किंवा सौंदर्य वाढवण्याचे अतिशयोक्त दावे करणारी उत्पादने आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली त्या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती आणि संस्थांविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपासात उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून अहवालानुसार आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
एफडीएने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही सौंदर्यप्रसाधन खरेदी करताना त्यावरील परवाना क्रमांक, उत्पादन दिनांक, उत्पादकाची माहिती आणि गुणवत्ता प्रमाणपत्र यांची खात्री करूनच खरेदी करावी. संशयास्पद किंवा भ्रामक उत्पादने आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी.
