Wednesday, October 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दुष्काळी बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार; फडणवीसांचा इशारा

मुंबई : दुष्काळी उपाययोजनांच्या आढावा बैठकांना आचारसंहितेचे कारण देत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा अधिकाऱ्यांची नावे सादर करा, त्यांना थेट निलंबित करेन, असा सज्जड दम फडणवीस यांनी दिला. काही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दुष्काळ व्यवस्थापनासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आचारसंहितेचे कारण पुढे करून काही अधिकारी दुष्काळी आढावा बैठकांना उपस्थित राहत नसल्याने मदत आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्याचे मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. “दुष्काळाच्या बैठकीला आचारसंहितेचे कारण सांगून न येणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे मला द्या. त्या सर्वांना निलंबित करून टाकेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करताना आचारसंहितेचा अडसर येऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाशी संबंधित बैठकांसाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी मंत्र्यांना आपल्या अधिकारांचा वापर करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांना आवश्यक मदत मिळण्यात प्रशासकीय दिरंगाई होऊ नये, यावर फडणवीस यांनी भर दिला. आचारसंहितेच्या नावाखाली बैठका टाळणे किंवा दुष्काळ निवारणाच्या कामात अडथळे निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी या माध्यमातून प्रशासनाला दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading