Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

ऐसी अक्षरेचा ‘ऐसी वैद्यक अक्षरे’ विशेषांक


प्रतिभासंपन्न डॉक्टरांचे मराठी साहित्यातील योगदान वाचकांसमोर येणार

प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे व डॉ. गिरीश ओक यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन

पुणे : पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने प्रकाशित  होणाऱ्या ‘ऐसी अक्षरे’ या नियतकालीकाच्या ‘ऐसी वैद्यक अक्षरे’ या विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते येत्या रविवार, दि. २१ जून रोजी, सकाळी १०.३० वाजता नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृहात होणार आहे. प्रकाशन समारंभास प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती, बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेचे संस्थापक समीर बेलवलकर यांनी दिली.

‘ऐसी वैद्यक अक्षरे’ या विशेषांकाविषयी अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले, “गेल्या शंभर वर्षांमध्ये प्रकाशित झालेले दर्जेदार आणि उत्तमोत्तम साहित्य पुनर्प्रकाशित करून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या हेतूने ‘ऐसी अक्षरे’ या उपक्रमाला २००३ साली सुरुवात झाली. वाचन संस्कृती जोपासली जावी या विचारातून ‘ऐसी अक्षरे’ या अंकाची सुरुवात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कै. शरदचंद्र बेलवलकर यांनी केली. हा उद्देश समोर ठेऊन अनेक प्रतिभासंपन्न डॉक्टरांचे मराठी साहित्यातील लक्षणीय योगदान समाजासमोर यावे, नव्या पिढीला याबद्दल माहिती व्हावी या दृष्टीने ‘ऐसी वैद्यक अक्षरे’ या विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे.”

या विषेशांकाचे अतिथी संपादक व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक  डॉ. समीर जोग म्हणाले, “धकाधकीच्या आणि सतत तणावाखाली काम करावे लागणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही, उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तब्बल चौदा प्रथितयश डॉक्टरांचे अवैद्यकीय अर्थात नॉन मेडिकल आणि ललित साहित्य एकाच अंकात समाविष्ट करण्यात आले आहे आणि हे या विशेषांकांचे वैशिष्ट्य आहे.”

डॉ. आनंद नाडकर्णी, कै. डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शंतनू अभ्यंकर यासारख्या अनेक प्रतिथयश डॉक्टरांनी पर्यटनापासून ते कविता, नाट्यप्रवेश, प्रेमकथा अशा अनेकविध विषयांवर केलेले लिखाण एकाच अंकात वाचायला मिळणे ही साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी असेल. आपल्या कामाशिवाय वेगवेगळे छंद किवा कला डॉक्टर मंडळी आत्मानंदासाठी जपत असतात आणि अशा साहित्याद्वारे ते आपल्या जगाची मुशाफिरी वाचकांनाही घडवून आणत असतात. हा आगळावेगळा रंजक, अनुभव या विशेषांकाच्या वाचकांनाही मिळणार आहे, असे डॉ. जोग यांनी नमूद केले.

‘ऐसी वैद्यक अक्षरे’ या विशेषांकामध्ये जरा समजून घ्या – नाट्यप्रवेश (डॉ. विवेक बेळे), मंडई माझी (डॉ. अनिल अवचट), उद्याच्या भारताची पिढी (डॉ. ह.वि. सरदेसाई), अंधश्रद्धा निर्मुलन व नीती विचार (डॉ. नरेंद्र दाभोळकर), वा गुरु – नाट्यप्रवेश (डॉ. चंद्रशेखर फणसळकर), एक होता फेंगाड्या (डॉ.अरुण गद्रे), अमरुची प्रेमकविता (डॉ. लिली जोशी), सुपरस्टार यमदूत (डॉ. आनंद नाडकर्णी), दानशूर माणसांच्या गोष्टी (डॉ. राजेंद्र प्रभुणे), प्रकाशवाटा (डॉ. प्रकाश आमटे), वैज्ञानिक पद्धत (डॉ. शंतनू अभ्यंकर), लॉर्डस क्रिकेट स्टेडीयम (डॉ. मीना प्रभू) व नटसम्राट मधील गणपतराव बेलवलकर (डॉ. श्रीराम लागू) व डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेषांकाच्या प्रकाशन समारंभादरम्यान डॉ. मोहन आगाशे यांच्याशी  ‘मानसिक आरोग्य – वास्तव आणि भुलभुलैय्या’ या विषयावर दीनानाथ रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ. समीर जोग व निवेदक राजेश दामले संवाद साधतील.

वाचन संस्कृती जोपासली जावी आणि नवीन पिढीला दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे म्हणून सुरु केलेला ‘ऐसी अक्षरे’ हा उपक्रम गेली २४ वर्षे अव्याहतपणे पूर्णपणे अव्यावसायिक पद्धतीने राबवला जातो. वर्षातून ३ ते ४ वेळा प्रकाशित होणारे हे नियतकालिक,  कुठलाही आर्थिक उद्देश न ठेवता महाराष्ट्रातील अनेक वाचनालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये तसेच ४००० पेक्षा अधिक चोखंदळ, अभिरुची संपन्न मराठी वाचकांपर्यंत विनामूल्य पोहोचवले जाते.

वृत्तपत्रिय विशेषांक, भारतरत्न डॉ आंबेडकरांवरील आत्मोदार विशेषांक, प्रेमकथा विशेषांक, गुढकथा विशेषांक, दुर्ग विशेषांक, संतसाहित्य विशेषांक पासून ते अगदी शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यावरील विशेषांक असो, असे  विविध विषयांवरील, परस्पर भिन्न साहित्य वाचकांना वाचावयास मिळावे असा प्रयत्न ऐसी अक्षरे या नियतकालिकातून केला जातो.

ऐसी अक्षरे या उपक्रमाचे मनसे प्रमुख राज ठाकरे, कै. रा. ग. जाधव, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील, कै. दत्ता हलसंगीकर, अच्युत गोडबोले यासारख्या मराठी साहित्य विश्वामधील अनेक मान्यवरांनी मनापसून कौतुक केले आहे, माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते २०१७ मध्ये ऐसी अक्षरे च्या वृत्तपत्रीय विशेषांकाचे प्रकाशन झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading