Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रोहित पवारांच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करावी; प्रसाद लाड यांचे शरद पवारांना पत्र

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले असून, पत्राची प्रत पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवली आहे.
रोहित पवार यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमान अपघाताच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांशी पक्ष सहमत नसेल, तर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी त्यांचे जाहीर खंडन करावे. अन्यथा रोहित पवार यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करावे, असे लाड यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रसाद लाड यांनी रोहित पवार यांच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यावर अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी रोहित पवार यांनी आपले आरोप मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

“अजित पवार यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या भावासारखे प्रेमाचे संबंध होते. अजितदादांच्या कठीण काळात फडणवीस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी अशा प्रकारचा बेजबाबदारपणा थांबवावा,” असे लाड म्हणाले.
रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असून त्यांचे नातूही आहेत. त्यामुळे या प्रकरणात शरद पवार यांनी हस्तक्षेप करून पक्षाची भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित असल्याचे लाड यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्षा असल्याने त्यांनाही या आरोपांबाबत भूमिका मांडण्याची विनंती केली आहे.
शरद पवार हे राज्य आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवार यांच्याशी त्यांचे मुलाप्रमाणे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनीही यापूर्वी विमान अपघात ही दुर्घटना असल्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे आता फडणवीस यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा प्रसाद लाड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply