ज्येष्ठ संगीततज्ज्ञ, हार्मोनियमवादक डाॅ. अरविंद थत्ते यांचा सत्कार
पुणे – मानपत्र प्रदान करून माझा जो सन्मान केला, तो माझ्यापुरता नसून, तो कलापरंपरेचा सन्मान आहे, अशी माझी भावना आहे. त्या कलापरंपरेचे आणि डाॅ. वीणा सहस्रबुद्धे यांचे आदरपूर्वक स्मरण करून, मी हा सन्मान स्वीकारतो, असे उद्गार ज्येष्ठ हार्मोनियमवादक, संगीततज्त्र डाॅ. अरविंद थत्ते यांनी काढले.
ख्यातनाम शास्त्रीय गायिका स्व. संगीत महामहोपाध्याय डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सूर महती फाउंडेशनच्या वतीने नुकतेच सूर महती महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात संगीत आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन मान्यवरांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी देशातील आघाडीचे हार्मोनियम वादक, नामांकित साथसंगतकार आणि एकल वादक डॉ. अरविंद थत्ते तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डॉ. हरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. महोत्सवाचे संचालक अतुल खांडेकर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ. थत्ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील फरशी मैदानावर सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगला. रसिकांच्या हाऊसफुल प्रतिसादासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सूर महती महोत्सवाच्या प्रारंभी सुरश्री जोशी आणि चिन्मयी ओक यांचे सहगायन झाले. त्यांनी राग मुलतानीमध्ये गोकुल गाव के छोरा (विलंबित एकताल) आणि मध्यलय त्रितालात पकर मोरी बैय्या, ही रचना सादर केली. तराणा ऐकवून, त्यांनी रमैय्या की दुल्हनिया, हे निर्गुणी भजन सादर केले. त्यांना प्रणव गुरव (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम) यांनी साथ केली.
सरोदवादक अभिषेक बोरकर यांनी राग हेमंत छेडला. ते म्हणाले, राग हेमंत हा मैहर घराण्याचा खास राग मानला जातो. वाद्यसंगीतात तो प्रामुख्याने आढळतो. मात्र, कंठसंगीतात मी तरी हा राग फक्त वीणाताई सहस्रबुद्धे यांचाच ऐकला आहे. आलाप, जोड अशा क्रमाने वादन करत अभिषेक यांनी विलंबित तीनताल, तसेच रूपक तालात व द्रुत त्रितालातील रचना सादर केल्या. त्यांना प्रणव गुरव यांनी तबल्याची साथ केली.
त्यानंतर अबंती भट्टाचारजी यांनी ठुमरी-दादरा गायनाचा आनंद रसिकांना दिला. मिश्र खमाजमधील इतनी अरज मोरी मानले पिया ही झपतालातील रचना, मिया नजारे नही हा टप्पा, मिश्र पहाडीमधील रात हम देखेली सपना हो रामा, ही चैती आणि पूरबी शैलीचा दादरा ऐकवून त्यांनी सांगता केली. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अरविंद भट्टाचारजी (तबला), श्रेया अगलीकर (तानपुरा) यांनी साथ केली.
पहिल्या दिवसाची सांगता पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारुबिहागमध्ये रसिया हो न जाए, आज आये मोरे धाम श्याम या रचना ऐकवल्या. त्यानंतर राग भिन्न षड्जमध्ये दोन बंदिशी पेश केल्या. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (हार्मोनियम), अपूर्व द्रविड (टाळ), धनंजय म्हसकर (स्वरसाथ), अबोली देशपांडे व सरगम छन्ना यांनी तानपुर्याची साथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात अतुल खांडेकर यांनी राग मधुवंतीने केली. विलंबित एकतालातील ए मातु अंबिके आणि द्रुत त्रितालातील जय कालिके कालात्मिके, या पं, काशिनाथ बोडस यांच्या रचना त्यांनी उत्कटतेने सादर केल्या. पाठोपाठ राग नंदमधील ऊधो काहे आये ब्रिजमे (पं. बलवंतराय भट्ट यांची रचना) आणि धन धन भाग, या बंदिशी त्यांनी पेश केल्या. या नवनवल नयनोत्सवा हे नाट्यगीत सादर करून त्यांनी विराम घेतला. त्यांना केदार टिकेकर (तबला), मालू गावकर (हार्मोनियम), भक्ती खांडेकर (स्वरसाथ), अरुंधती खांडेकर व चैतन्य सरवटे (तानपुरा) यांनी साथ केली.
त्यानंतर ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी शिवस्तुतीपर रचनेतून रसिकांना नृत्याच्या विश्वात नेले. त्यांनी त्रितालातील रचनांची पेशकश केली. उठान, ठाट, तुकडे..अशा क्रमाने नृत्याविष्कार खुलवत नेताना, त्यांनी चक्रधार परण आणि एकहाती परण, अशा वेगळ्या रचनाही सादर केल्या. गतभावातून नायिकाभेदाकडे नेत, त्यांनी सादर केलेल्या चंचल आणि घमंडी नायिका विशेष दाद मिळवून गेल्या. त्यांचा डौलदार पदन्यास, नृत्यातील मुद्राभिनय, ताल-लयीचा मेळ आणि देखणे सादरीकरण, यामुळे रसिकांनी त्यांना वन्समोअरची दाद दिली. घट घट मे पंछी बोलता या कबीर भजनाने त्यांनी विराम घेतला. त्यांना निखिल फाटक (तबला), संदीप अवचट (बासरी), राजीव तांबे (हार्मोनियम) अर्पिता वैशंपायन (गायन), वल्लरी आपटे (पढंत) यांनी साथ केली.
सूर महती महोत्सवाची सांगता पं. साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांच्या सहगायनाने झाली. त्यांनी समयोचित राग जोगकंस सादर केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला) निषाद व्यास (तानपुरा) यांनी साथ केली. चलो मन वृंदावन की ओर..या भक्तिरचनेने त्यांनी वातावरण भक्तिरसमय केले. डाॅ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या ध्वनिमुद्रित भैरवी रचनेने महोत्सवाची सांगता झाली. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
