Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमित शाह हे केवळ चकाट्या पिटणारे गृहमंत्री; मणिपूर, अरुणाचलमध्ये जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवा : उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांना देशातील महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा राजकीय टीका करण्यातच अधिक रस असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख ‘चकाट्या पिटणारे गृहमंत्री’ असा केला. मणिपूरमधील परिस्थिती आणि अरुणाचल प्रदेशातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष त्या भागात जावे, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.
पुण्यातील कार्यक्रमात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी शाह यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. लोकसभेतील त्यांच्या वर्तनावरही त्यांनी टीका केली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चकाट्या पिटण्यापलीकडे त्यांनी काय केले, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचाही ठाकरे यांनी उल्लेख केला. अजित पवार यांच्यावर हयात असताना ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप करून त्यांचे राजकीय जीवन कठीण करण्यात आले. मात्र, त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करताना अमित शाह यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले, हे दुर्दैवी असल्याचे ठाकरे म्हणाले.
पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर शाह यांनी अजित पवार यांची माफी मागायला हवी होती. त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे होते, हे मान्य करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करायला हवी होती. अजित पवार हयात असताना त्यांच्याबद्दल असे दोन शब्द बोलले असते, तर त्यांना समाधान मिळाले असते, असे ठाकरे म्हणाले.
अमित शाह यांनी राजकीय टीका करण्याऐवजी मणिपूरमध्ये जावे. अरुणाचल प्रदेशातील नागरिक आपल्या समस्या मांडत आहेत; मात्र त्यांचे फोनही शाह घेत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. देशाच्या सीमाभागातील नागरिक आणि सैनिक चीनच्या आव्हानाला तोंड देत आहेत. अशा वेळी लष्करी छावण्यांना भेट देऊन सैनिकांचे आणि नागरिकांचे मनोबल वाढवण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.
कोरोना महामारीच्या काळातील महाराष्ट्राच्या कामगिरीवरूनही ठाकरे यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिले. अमित शाह यांनी फोन केले आणि आपण ते घेतले नाहीत, हा दावा खरा असता, तर उत्तर प्रदेशमध्ये गंगेत मृतदेह वाहून जाण्याचे आणि गुजरातमध्ये सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे जे चित्र दिसले, तसे महाराष्ट्रात दिसले असते, असे ठाकरे म्हणाले.
कोरोना काळात धारावीपासून राज्यातील विविध भागांपर्यंत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या वाजवण्याचे आवाहन करूनही जे साध्य झाले नाही, ते महाराष्ट्राने प्रत्यक्ष कामातून करून दाखवले, असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी तफावत असल्याचे सांगत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. देशाच्या कारभारात बदल होण्याची गरज असून, केवळ राजकीय वक्तव्ये करणाऱ्यांना सत्तेतून बाजूला केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Leave a Reply