Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

१९ ते २१ जूनदरम्यान ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’

पुणे  : सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’ या प्रतिष्ठित तीन दिवसीय भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २१ जून २०२६ या कालावधीत, न्यू ऑडीटोरियम, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रस्ता, पुणे येथे संपन्न होणार आहे.
महोत्सवाचे आयोजन चार सत्रांमध्ये करण्यात आले असून, १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता, २० जून रोजी सायंकाळी ४ वाजता तसेच २१ जून रोजी सकाळी ८.३० वाजता आणि सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

या महोत्सवाला एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान खान, कन्नड संघाच्या उपाध्यक्षा इंदिरा सलीयन तसेच सचिव मालती सुरेश कलमाडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवार, १९ जून रोजी ‘सितार पंचक’ या अनोख्या सादरीकरणाने होणार असून धारवाड घराण्याचे नामवंत सतारवादक उस्ताद छोटे रहिमत खान, उस्ताद रफीक खान, उस्ताद शफीक खान, रईस बाले खान आणि मन्सूर खान हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांना तबल्यावर हेमंत जोशी आणि सोहम गोराणे यांची साथ लाभणार आहे. याच दिवशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते कथक नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र तसेच बेंगळुरूच्या अभिनव समूहाकडून ‘बहरंग’ या कथक नृत्याविष्काराचे सादरीकरण होणार आहे.

शनिवार, २० जून रोजी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन होणार असून, त्यांना तबल्यावर ऋषिकेश जगताप आणि हार्मोनियमवर गंगाधर शिंदे साथ करणार आहेत. त्यानंतर सुप्रसिद्ध संतूरवादक पं. अभय रुस्तुम सोपोरी यांचे संतूर वादन होईल. त्यांना तबल्यावर पं. रामदास पळसुले साथ देतील. दिवसाची सांगता प्रख्यात गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर साथ करणार आहेत.

रविवार, २१ जून रोजी सकाळच्या सत्राची सुरुवात उस्ताद अरशद अली खान यांच्या गायनाने होईल. त्यांना भरत कामत आणि सुयोग कुंडलकर यांची साथ लाभेल. त्यानंतर श्रोत्यांना पं. जयतीर्थ मेवुंडी आणि प्रख्यात बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी यांची अलौकिक गायन–बासरी जुगलबंदीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी आणि हार्मोनियमवर नरेंद्र नायक साथ करतील.

सायंकाळच्या सत्रात अभिषेक बोरकर आणि मोहसिन खान यांची सरोद–सितार जुगलबंदी रंगणार असून, त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी साथ देतील. त्यानंतर ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार आणि हार्मोनियमवर अभिनय रवांडे साथ करणार आहेत.

महोत्सवाची सांगता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंडित व्यंकटेश कुमार यांच्या मैफलीने होणार आहे. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर साथ करतील.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा सहभाग लाभलेल्या या महोत्सवातून रसिकांना समृद्ध सांगीतिक आणि सांस्कृतिक अनुभव घेण्याची पर्वणी लाभणार असून, हिंदुस्थानी शास्त्रीय कलेच्या समृद्ध परंपरेचा उत्सव अनुभवता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading