केअर टेकर्स सोसायटीतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन


पुणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आॅक्सिजन बेडची देखील कमतरता भासत आहे. अनेक रुग्णांना केवळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत अनेकदा रुग्ण दगावल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ही परिस्थिती पाहता पुण्यातील केअर टेकर्स सोसायटीने पुढाकार घेत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चार मशीन व पाच ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर दिले आहेत.  
आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास देण्यात आले. यावेळी एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभिये, नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, कल्पना मुळगावकर, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दिपक नागपुरे, आधार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला रणजित परदेशी, इरफान मुल्ला, विजय बेलिटकर, संजय असरकर, शशिधर पुरम, विष्णू दोशी, पवन देडगावकर, गणेश चित्ते, सुमित अग्रवाल, अ‍ॅड.सुफियान खान यांचे सहकार्य लाभले. यावेळी हर्षल खेडेकर व तेजस कोळभोर यांनी आॅक्सिजन मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले. 
सुनिल कांबळे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी अनेक लोक अहोरात्र काम करीत आहेत. या लोकांवर येणारा बोजा कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. कोरोनाच्या या महामारीच्या काळात केअर टेकर्स सोसायटी सारख्या संस्था पुढे येवून नागरिकांना मदत करीत आहेत.

राजेश पांडे म्हणाले, ज्या प्रकारे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे, ही परिस्थिती ओळखून केअर टेकर्स संस्था मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध करून देण्याचे मोठे काम करीत आहे. अनेकदा ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांना त्रास होताना दिसत आहे. त्यासाठी काही सीएनजी रिक्षांमध्ये अशा मशिनचे किट बसवून त्या रिक्षा नागरिकांसाठी उपलब्ध करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
कुमार शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. या परिस्थितीचा विचार करुन केअर टेकर्स सोसायटीच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन कॅन्टोन्मेट बोर्ड येथील रुग्णालयाला दिले असून तसेच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत रुग्णांना या मशिनचा उपयोग होणार आहे. हे मिशन वापरण्यासाठी रुग्णांना डॉक्टरांचे मागणी पत्र व आधार कार्ड हे कागदपत्र लागणार असून हे मशिन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील सामाजिक संस्थांनी असे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले तर अनेकांचे जीव वाचतील, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: