कृषी धोरण विरोधात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा; मोदी सरकारला झटका

नवी दिल्ली, दि. 17 – संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात मोदी सरकारकडून कृषी क्षेत्राशी निगडित विधेयकं मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. मात्र, ही विधेयकं शेतकरीविरोधी असून त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल, अशी ठाम भूमिका घेत केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न प्रक्रिया उद्योग खात्याच्या मंत्रीपदी असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

‘केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी अध्यादेश आणि कायद्याविरोधात मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. देशातल्या शेतकऱ्यांची बहीण आणि मुलगी म्हणून ही भूमिका घेताना मला अभिमान वाटतोय’, असं ट्वीट हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे. दरम्यान, हरसिमरत कौर बादल यांचा शिरोमणी अकाली दल केंद्रात एनडीएमध्ये सहभागी आहे. हरसिमरत कौर यांनी जरी राजीनामा दिला असला, तरी शिरोमणी अकाली दलाचा केंद्राला पाठिंबा कायम असल्याचं सांगितलं जात आहे.

शिरोमणी अकाली दलाकडून सुरुवातीपासूनच शेतीविषयक धोरणांविषयी आक्रमक भूमिका घेतली जात होती. मात्र, मोदी सरकारकडून आणण्यात आलेली शेतीविषयक विधेयके पक्षाचं समाधान करणारी नसल्यामुळे पक्षाकडून त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष आणि हरसिमरत कौर बादल यांचे पती सुखबीर सिंग बादल यांनी ‘सरकारच्या शेतकरी विरोधी राजकारणाचं पक्ष समर्थन अजिबात करणार नाही. कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचा वायदा भाजपनं केला होता. मात्र, सरकारकडून आणली जाणारी विधेयके त्या ध्येयाच्या विपरीत आहेत’, अशी भूमिका सुखबीर सिंग बादल यांनी मांडली आहे. आता यावर NDA किंवा भाजपकडून कोणत्या प्रकारची पावलं उचलली जातात, याकडे दिल्लीच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: