पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप; १६९ नियुक्त्या रद्द करून फेरपरीक्षेची मागणी
पुणे : राज्यात विविध स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत असतानाच आता पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात प्रशासनातील एका वरिष्ठ व्यक्तीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
कनिष्ठ अभियंता परीक्षेतील गैरप्रकार १६ जून रोजीच निदर्शनास आला होता, असा दावा भानगिरे यांनी केला. पुणे महापालिका प्रशासनाने परीक्षेदरम्यान तीन उमेदवारांनी कॉपी केल्याचे मान्य केले होते. असे असताना या प्रकरणाची पूर्ण चौकशी होण्यापूर्वीच १६९ उमेदवारांची नियुक्ती कशी करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच आधीच बाहेर आल्याचा आरोपही भानगिरे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रक्रियेतून झालेल्या १६९ नियुक्त्या नियमबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गैरप्रकाराची शक्यता असताना नियुक्त्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर १६९ उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करून कनिष्ठ अभियंता पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. तसेच परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे प्रामाणिक उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली.
एमपीएससी आणि उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर आता पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर आरोप झाल्याने भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
