Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदेच्या शेतकरी मेळाव्यात घोषणाबाजी; पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

परभणी प्रतिनिधी : खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

जिल्ह्यासह आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी मेळाव्यासाठी दाखल झाले होते. खासदार संजय जाधव भाषण करत असताना काही व्यक्तींनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना सभास्थळाबाहेर काढले.

दरम्यान, या मेळाव्याला विरोध करण्यामागे मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू असल्याने शेतकरी मेळावा रद्द करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांच्याकडे केली होती. यासंदर्भात जरांगे यांनी जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून कार्यक्रम रद्द न केल्यास आपण स्वतः तेथे येऊन विरोध करू, असा इशारा दिल्याचे सांगितले जाते.

मात्र, जाधव यांनी मेळावा रद्द न करता तो नियोजित वेळेनुसार घेतला. त्यानंतर कार्यक्रमाबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करत विरोध दर्शविला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या मेळाव्याच्या ठिकाणी वातावरण शांत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading