Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इतरांचा घास काढून न घेता मराठा समाजाला न्याय देणार; शिंदेंचा दावा

 

परभणी प्रतिनिधी | परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया महायुती सरकारने सुरू केली असून, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारमधील मंत्री अद्याप चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार संजय जाधव यांच्या वतीने परभणीत शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू असल्याने हा मेळावा रद्द करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. कार्यक्रम रद्द न केल्यास स्वतः उपस्थित राहून मेळावा बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी कोणावरही टीका करण्याची इच्छा नसल्याचे सांगत नियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, खासदार संजय जाधव यांनीही मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली. “मनोज जरांगे पाटील यांचे मी मनापासून स्वागत करतो. कार्यक्रम सकाळी ११ वाजता नियोजित होता. ऐनवेळी तो रद्द केला असता तर मोठी परिस्थिती निर्माण झाली असती. माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे जाधव यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होताच काही मराठा आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यानंतरही काही काळ घोषणाबाजी सुरू होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading