Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

मुंबईत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही – रामदास आठवले

मुंबई – कंगना रनौत विरुद्ध शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने कंगनाच्या प्रशस्त कार्यालयावर बुलडोझर चालवल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. मनालीतून कंगना मुंबईत परतत असतानाच या कारवाईचा मुहूर्त पालिकेच्या अतिक्रमण विभागाने साधला. त्यावर कंगनाने तीव्र संताप व्यक्त केलाच शिवाय कोर्टातही धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशाने तूर्त ही कारवाई थांबवण्यात आली असताना आज रामदास आठवले यांनी कंगनाची भेट घेऊन त्यांचा पक्ष तिच्यासोबत असल्याचे सांगितले.

एक तासाच्या भेटीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना, मुंबई पालिका व कंगनाशी पंगा घेणारे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘कंगनाशी माझं विस्तृत बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तिने रागाच्या भरात केला होता, असे बोलण्यातून स्पष्ट झाले. ती केलेल्या एकेरी उल्लेखाचे मी समर्थन करत नाही. मात्र कंगनाच्या कार्यालयावर जी कारवाई करण्यात आली ती सूड घेण्याच्या इराद्यानेच झाल्याचे स्पष्टच दिसत आहे. मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि राज्यातही शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे कंगनाने काही चुकीचं केलं होतं तर ती मुंबईत आल्यावर रितसर नोटीस तिच्या हाती देऊन कारवाई करायला हवी होती. आता कारवाईला स्थगिती दिली असली तरी पालिकेने दोन चार इंच अतिक्रमणापलिकडेही बरेच अधिकृत बांधकाम तोडले आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टाळू शकले असते. मात्र त्यांनी ते केले नाही. त्यामुळे या सर्वाला सरकारचा पाठिंबा होता, असा संशय घ्यायला वाव आहे, असे आठवले म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये कंगनावर ड्रग्जबाबत आरोप करण्यात आले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय हे आरोप करण्यात आले आहेत. त्यासाठी सामना आणि या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आठवले यांनी केली. कंगनाने सुशांत प्रकरणात जे दावे केले आहेत त्यात तथ्य आहे. सुशांतसिंह राजपूतची हत्याच झाली आहे. सीबीआयने याप्रकरणी वेगाने तपास करावा व प्रकरणाचा छडा लावावा, असा आग्रह आठवले यांनी धरला. तसेच कंगनाची बाजू सावरत मुंबईत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही, असं म्हणाले. तसंच, मुंबईत सर्वांनाच राहण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading