बाबरी मशिद – २८ वर्षांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
लखनौ, दि. ३० – बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला असला, तरी ६ नोव्हेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी अजूनही सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयानं या प्रकरणातल्या सर्व ३२ आरोपींची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. ‘हा पूर्वनियोजित कट नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कारसेवकांनी रागाच्या भरात उत्स्फूर्तपणे बाबरी मशीद पाडली, त्यामागे कोणताही कट नव्हता’, असं स्पष्ट केलं आहे.
१ सप्टेंबर रोजी ही सुनावणी संपली आणि न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत निकालाचं वाचन राखून ठेवलं होतं. आज न्यायालयाने हे निकालांचं वाचन सुरू केलं. या खटल्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साक्षी महाराज, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, जयप्रकाश गोयल, रामजी गुप्ता यांच्यासह एकूण ४८ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी १६ जणांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्यामुळे आता एकूण ३२ आरोपींच्या शिक्षेचा फैसला घटनेच्या २७ वर्षांनंतर आज सुनावण्यात येणार होती. यासाठी एकूण ३२१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रांचा समावेश करण्यात आला होता. यावर सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांच्यासमोर तब्बल २ हजार पानांचं हे निकालपत्र होतं. लखनौच्या केसरबाग भागात असलेल्या उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीत ‘अयोध्या प्रकरण कोर्ट’ या नावाने हे विशेष न्यायालय काम करत होतं.