महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सव ‘ऑनलाईन’ व साधेपणाने

-श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन
पुणे : जागतिक महामारी कोरोनाचा फटका संपूर्ण देश तसेच श्री महालक्ष्मी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाला देखील बसला आहे. त्यामुळे यंदाचा श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व सर्व धार्मिक कार्यक्रम आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली. 
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागचे प्रमुख विश्वस्त व विश्वस्तांच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सभेला प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा आदी उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत साधा पण सर्व धार्मिक पूजा, होम, अभिषेक करून तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून यंदाचा उत्सव साजरा होणार आहे. भक्तांच्या आरोग्यादृष्टीने सर्वांचे हित घेता हा निर्णय ट्रस्टच्या विश्वस्तांनी घेतला आहे. तसेच प्रशासनाच्या सर्व सूचनांनुसार खबरदारी घेण्यात येणार आहे. 
अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रात १५ ते २० लाख भाविक येतात. नवरात्र महोत्सवाच्या १० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून दररोज हजारो भाविक येथे येतात. यामध्ये ललित पंचमी, अष्टमी तसेच नवरात्रातील मंगळवार, शुक्रवार, रविवारी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, यावर्षी गर्दी टाळून आॅनलाईन दर्शन घ्यावे. आणि मंदिराची वेबसाईट, फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

घरबसल्या अभिषेक, महायाग व सर्व पूजांमध्ये भक्तांना घेता येईल सहभाग
नवरात्र महोत्सवामध्ये सकाळी ६ ते ७ व सकाळी ८ ते ९ या वेळेत भाविकांना आॅनलाईन संकल्प करुन अभिषेक करता येईल. मंदिरात दररोज श्री महालक्ष्मी महायाग ( हवन ) सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ४ ते ८ व अष्टमी दिवशी श्रीदुर्गासप्तशती महायाग करण्यात येईल.  तसेच रोज सकाळी ७:१५ वाजता व संध्याकाळी ७:१५ वाजता महाआरती होईल. वरील सर्व पूजा या आॅनलाईन पध्दतीने केल्या जातील. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन नाव नोंदणी करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: