समाजकार्यकडे जबाबदारी म्हणून नाही तर नैतिकता म्हणून पाहिले
सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई शहा आणि डिंपल घाडगे यांचे प्रतिपादन
‘सामान्य ते असामान्य’ या मुलाखतपर कार्यक्रमात उलगडला दोघींचा संघर्षमयी प्रवास
पुणे : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि ते फेडावे या भावनेने माझी आई म्हणजेच मंगलताई शहा यांना लहानपणापासूनच काम करताना पाहिले. बाई त्या वेळी वैश्या वस्तीत जाऊन प्रबोधनाचे काम करायची, तिथल्या मुलांसाठी संस्कार वर्ग चालवायची. कुष्ठरोग्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या जखमा साफ करायची. लहानपणापासून तिचे हे काम, करुणा आणि धडपड पहात होतो. त्यामुळे मोठे होत असताना समाजसेवा करायची हे मनात असले तरी त्याकडे केवळ जबाबदारी म्हणून नाही तर नैतिकता म्हणून पाहिले, अशा भावना समाजसेविका आणि एचआयव्हीग्रस्त मुला मुलींसाठी पंढरपूर येथे गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ‘पालवी’ संस्थेच्या संस्थापक संचालिका डिंपल घाडगे यांनी व्यक्त केल्या.
पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुत्क विद्यमाने आयोजित ‘सामान्य ते असामान्य’ या प्रकट मुलाखत व संवादात्मक कार्यक्रमात घाडगे बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या ‘पालवी’ या संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा आणि संस्थापक संचालिका डिंपल घाडगे यांची मुलाखत घेण्यात आली.
कामाला सुरुवात केली तेव्हा समाजामध्ये एचआयव्ही ग्रस्त रुग्णांसाठी असलेला तिरस्कार जवळून बघितला. त्यावेळी त्यांचा राग यायचा. मात्र आता मागे वळून पाहताना समाजातील ते अज्ञान व गैरसमज दूर करायचा आणखी प्रयत्न केला असता तर काम करणे थोडे सुसह्य झाले असते, असे मंगलताई शहा म्हणाल्या.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री- चित्रपट निर्मात्या भाग्यश्री देसाई या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र देत मंगलताई शहा आणि डिंपल घाडगे यांना सन्मानित करण्यात आले. पी एम शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड चेतन गांधी, वर्धमान प्रतिष्ठानचे विश्वस्त जीतूभाई तातेड आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ॲड चेतन गांधी यांच्या मातुश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालवी या संस्थेला या निमित्ताने रोख रक्कम देत मदत करण्यात आली. यासोबतच स्वामिनी ग्रुपच्या वतीनेही संस्थेला मदतीचा हात देण्यात आला.
२००१ साली गोठ्यात जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन एचआयव्हीग्रस्त मुलींच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास महाराष्ट्रातील कोणतीच समाजसेवी संस्था, सरकारी संस्था किंवा रुग्णालय पुढे येत नसल्याने त्या दोघींच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन काम सुरू केले असे सांगत मंगलताई म्हणाल्या, “सुरुवातीला एड्स या आजाराबद्दल अज्ञान तर होतेच शिवाय समाजामध्ये अक्षरशः तिरस्कार होता. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी आल्या. मदतीला कोणी यायचे नाही, प्रवास करताना सार्वजनिक वाहन वापरता यायचे नाही, कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागायचा. गावातील लोकांनी वीज, पाणी कापून टाकले होते. समाजातून जणू बेदखल केले होते. अशा बिकट परिस्थितीत काम केले.”
मी काम सुरू केले तेव्हा डिंपल शाळेत होती. ही मुलगी तेव्हापासून माझ्या समाजकार्यात माझी मैत्रीण म्हणून सोबत उभी राहिली आज तिचे पती, मुलगे, मुली अगदी जावई देखील या कार्यात सहभागी आहेत याचे समाधान असल्याचे मंगलताई शहा म्हणाल्या. समाजाने समाजकार्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही देणे महत्त्वाचे आहे याकडे मंगलताई यांनी लक्ष वेधले.
दोन मुलींच्या संगोपनातून आमच्या समाजसेवेला सुरुवात झाली होती आज १५० मुले मुली निवासी रहात असून संस्थेतच शिक्षण घेत आहेत. आजवर आमच्या १८ मुलींची लग्न झाली असून त्या संसारात खूष आहेत. प्रत्येकाला संस्थेबद्दल आपुलकी आणि कृतज्ञतेची भावना आहे, संस्थेसाठी अनेक जण आजही काम करत आहेत याचे आम्हाला कौतुक आहे, असे डिंपल घाडगे म्हणाल्या.
एचआयव्ही ग्रस्त मुलांवर आलेल्या या परिस्थितीत त्यांचा खरेतर काहीच दोष नाही, हे मान्य करण्याची समज आज युवा वर्गात असून हळूहळू का होईना पण या आजारा संबंधी गैरसमज दूर होत आहे, याचे समाधान डिंपल घाडगे यांनी व्यक्त केले.
सध्या संस्थेत मनोरुग्णांना सांभाळण्याचे आणि त्यांवर उपचारांचे काम देखील सुरू असून नजीकच्या भविष्यात १०० मुले आणि ५०० महिलांना सामावून घेणारे पुनर्वसन गुरुकुल उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिंपल घाडगे यांनी दिली.
कोणतेही चांगले काम करताना प्रोत्साहन देणारे, दूरदृष्टीने विचार करणारे कमी भेटतात पण खीळ बसविणारे अनेक भेटतात. जी तत्वे आपण पुस्तकात शिकतो ती जीवनात उतरवायला मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. जे काम आयुष्यभर केले त्याचे समाधान आहे. हे काम करण्यासाठी देवाने आमची निवड केली आहे याचा आनंद असल्याचे मंगलताई म्हणाल्या. ॲड चेतन गांधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
