जागतिक आरोग्यसंपदेकरीता ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर सलग १५ दिवस चार वेदांचे पठण व यज्ञ-याग

पुणे : जागतिक स्तरावर उद््भविलेल्या कोरोना महामारीचा मुकाबला करण्याकरीता बळ मिळावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपती समोर सलग १५ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह गणेश याग, नवचंडी हवन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये केवळ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ढुंडीराज तथा अधिक मासानिमित चार वेदांच्या संहितेचे पठण मुख्यत्वे आयोजित केले आहे. यांसह विविध यज्ञ, यागांच्या माध्यमातून कोरोनाचे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे. 
मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत ॠग्वेदातील १०६२७ मंत्रांचे वेदमूर्ती नारायण आराध्ये व सचिन कुलकर्णी, यर्जुवेदातील १९७५ मंत्रांचे वेदमूर्ती सागर विरसणीकर, बाळकृष्ण गोखले, लक्ष्मीकांत जोशी व तुषार देवधर, सामवेदातील १८७५ मंत्रांचे वेदमूर्ती गणेश पुराणिक व सचिन जोशी आणि अथर्ववेदातील ५९७७ मंत्रांचे वेदमूर्ती निलेश जोशी व निखील पांडे हे या चार वेदांचे संहिता पारायण होणार आहे. तसेच, दिनांक ५ ते ९ आॅक्टोबर दरम्यान  मुख्यत्वे सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग आणि नवचंडी पाठ व हवन असणार आहे. दिनांक ५ आॅक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग, विशेष अभिषेक राजोपचार व एकविंशती आवरण पूजन आणि सहस्त्रदुर्र्वाचन, दिनांक ६ आॅक्टोबर, मंगळवार रोजी सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग होईल. 
दिनांक ७ ते ९ नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक ७ आॅक्टोबर रोजी कोरोनाच्या निर्वाणार्थ संपुटीत सप्तशती पाठ, दिनांक ८ आॅक्टोबर रोजी देवी राजोपचार पूजा, सहस्त्रकुंकुमार्चन, नवार्ण पूजन आणि दिनांक ९ आॅक्टोबर रोजी चंडीहवन व पूर्णाहुती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मोरगाव येथील वेदमूर्ती दिलीप वाघ हे ब्रह्मणस्पती सुक्ताचे हवन करणार आहेत.  
याशिवाय दिनांक २ ते ४ आॅक्टोबर दरम्यान सुदर्शन याग, धन्वंतरी याग व उग्रनरसिंह हे विश्वाचे पालक भगवान विष्णूंचे याग वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली होतील. तर, मंगळवार, दिनांक १३ आॅक्टोबर रोजी मुद््गलपुराणातील विविध देवता आणि ॠषीमुनींनी श्री गणेशाची स्तुती केलेल्या विविध स्तोत्रांचे पठण व हवन वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली होणार आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीचे निवारण करण्याकरीता व जनकल्याणार्थ सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरीता आणि गणेश कृपा होण्याकरीता माता सिद्धी-बुद्धी यांच्याकडे संकल्प केला जाईल. तसेच नग्नभैरवाकडे सगळ्या दुष्ट शक्तींचा नायनाट करण्याकरीता आवाहन केले जाणार आहे. अधिक मासामध्ये केलेली प्रार्थना अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे अधिक प्रमाणात गणरायापर्यंत पोहोचते, या श्रद्ध्ेने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 
मंदिर बंद असून ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवरुन भक्तांना सहभागी होता होईल. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: