Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

संवेदनशील ज्ञानेंद्रिये आणि वेळेची गुंतवणूक यावर आयुष्याची सार्थकता अवलंबून – डाॅ. मोहन आगाशे

पुणे  : आपल्याला लाभलेल्या ज्ञानेंद्रियांमार्फत आपण संवेदनशीलतेने काय जाणू शकतो आणि वेळेची गुंतवणूक कशी करतो, यावर जगण्याची सार्थकता अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ मनोवैद्यकशास्त्रतज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांनी रविवारी येथे केले. ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण करण्याच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत. बुद्धी आणि विचारांसह भावनांचे महत्त्वही लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने सलग २४ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘ऐसी अक्षरे’ या नियतकालिकाच्या ‘ऐसी वैद्यक अक्षरे’ या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे आणि डाॅ. गिरीश ओक यांच्या उपस्थितीत झाले. बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर आणि अंकाचे अतिथी संपादक डाॅ. समीर जोग आणि संपादक पद्मनाभ हिंगे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकाशनानंतर डाॅ. जोग आणि राजेश दामले यांनी डाॅ. आगाशे यांच्याशी ‘मानसिक आरोग्य – वास्तव आणि भुलभुलैया’ या विषयावर संवाद साधला.

डाॅ. आगाशे म्हणाले, आपल्या संस्कृतीत भावना व्यक्त कशा कराव्यात, याऐवजी भावनांवर सतत नियंत्रण कसे ठेवावे, त्यांच्यावर ताबा कसा मिळवावा, याचेच संस्कार केले जातात. परिणामी वर्षानुवर्षे कित्येक व्यक्ती, विशेषतः स्त्रिया, मौन बाळगतात आणि कौटुंबिक, सामाजिक स्तरावरही भावनांना किंमत उरत नाही. व्यक्तीचा कोंडमारा होतो आणि मानसिक आजार गंभीर रूप धारण करतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणून घेण्यासाठी विविध चाचण्या सहजपणे केल्या जातात, पण मानसिक आजाराला मूळात आजार किंवा रोग मानायलाच समाजाची तयारी नसते. बौद्धिक समस्यांवर उत्तरे शोधणे अगत्याचे मानले जाते, पण मानसिक – भावनिक समस्या दुर्लक्षित केल्या जातात. त्यामुळे शरीराइतकेच मनही महत्त्वाचे आहे, हे आधी मान्य होणे आवश्यक आहे.

मानसिक आजाराच्या लक्षणांविषयी ते म्हणाले, मूळात मनाचे अस्तित्व आधी मान्य केले पाहिजे आणि दुसरे स्वतःप्रमाणेच प्रत्येकाला मन असते, हेही मान्य केले पाहिजे. मन सतत वेगवेगळ्या अवस्थांतून फिरत असते, भावना हा त्याचा अविभाज्य भाग असतो. पण आपले वैद्यकीय शिक्षणही पाठ्यपुस्तकांनुसार होते. तो बुद्धीचा भाग असतो. पण मन, भावना हे सब-टेक्स्ट असते, याचा विसर पडतो. जगणे फक्त बौद्धिक नसते, ते भावनामय असते म्हणजेच सबटेक्स्ट असते आणि त्याला वेळेचा आयाम असतो. वैद्यकीय शिक्षणात – प्रशिक्षणात शरीरशास्त्र शिकवतात, पण मानसशास्त्र शिकवत नाहीत. नाटक, चित्रपट, साहित्यादी ललित कला मात्र बुद्धीसह मन, भावनांचा विचार प्राधान्याने करतात आणि जिथे शब्द थांबतात, तिथे सुरांमधील अभिव्यक्तीची सुरवात होते. मानसिक आरोग्य हा विषय मुख्य धारेतील चित्रपटांनी विनोदाचा करून ठेवला, सुमित्रा भावेंसारख्या एखाद्याने व्यक्तीने हा विषय केंद्रस्थानी ठेवून, उत्तमोत्तम शास्त्रीय तथ्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली. श्रद्धा, धार्मिकता आदी विषयांची सरमिसळ मानसिक आरोग्याशी करू नये. फक्त सतर्क राहून, ज्ञानेंद्रियांचा संवेदनशील वापर करावा, असे ते म्हणाले.

अतिथी संपादक म्हणून मनोगत मांडताना डाॅ. समीर जोग म्हणाले, वैद्यकीय पेशा करणारे पण ललित साहित्याची निर्मिती करणारे डाॅक्टर लेखक अनेक आहेत, हे या निमित्ताने समजले. जन्म, अस्तित्व आणि मृत्यू या तीनही स्थितींशी जवळून संबंध असलेला वैद्यकीय पेशा संवेदनशीलतेने करणारे १४ वैद्यक लेखक या अंकातून वाचकांना भेटतील. मनोरंजनापलीकडे जात अनोख्या संवेदना आणि अनुभूतीचा प्रत्यय देतील.

स्वागतपर प्रास्ताविक करताना समीर बेलवलकर यांनी ऐसी अक्षरे चा २३ वर्षांचा प्रवास उलगडला. पेशा वैद्यकीचा करणारे, पण सलगी शब्दांशी करणारे अनेक वैद्यकीय व्यावसायिक इथे लेखकाच्या भूमिकेत भेटतील. अनेक प्रतिभासंपन्न डॉक्टरांचे मराठी साहित्यातील लक्षणीय योगदान वाचकांसमोर एकत्रित स्वरूपात या अंकाच्या माध्यमातून येत आहे, असे ते म्हणाले.

डाॅ. गिरीश ओक म्हणाले, मी डाॅक्टरकी सोडली, त्याला ४२ वर्षे उलटली. मी ॲक्टरकी स्वीकारली आणि नंतर लेखनाच्या क्षेत्रातही काही लुडबुड केली. काही काळापूर्वी ऐसी अक्षरेच्या अंकासाठी मी लेखन केले आहे. या अंकातही माझ्या अनेक मित्रांचे लेखन आहे. अभिनेते मोहन जोशी यांच्याकडून मी सकारात्मकतेची प्रेरणा घेतली आहे. आज फादर्स डे आहे. अशा वेळी वडिलांनी सुरू केलेला उपक्रम उत्तम पद्धतीने पुढे नेणारे बेलवलकर इथे आहेत, हे औचित्याचे आहे.

राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading