Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

रसिकांनी अनुभवला ललित कलांचा अभिजात आविष्कार

 

पुणे  – नृत्य, वादन आणि गायन, अशा ललित कलांचा अभिजात स्वरूपाचा आविष्कार रसिकांनी शनिवारी सायंकाळी दीपक या मैफिलीच्या निमित्ताने अनुभवला. युवा नृत्यांगना श्रीजा विश्वास, ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश समसी आणि विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, यांच्या रंगतदार प्रस्तुतीने ही सायंकाळ सुश्राव्य आणि दर्शनीय झाली.

सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या कथक नाद या संस्थेच्या वतीने शनिवारी मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृह येथे सायंकाळी ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश होता.

शीतल कोलवालकर यांच्या कथक नाद या संस्थेच्या वतीने गेली चार वर्षे कोलवालकर यांचे वडील दीपक कोलवालकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाद्वारे नवोदित व आश्वासक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच नावाजलेल्या दिग्गज कलाकारांचे देखील सादरीकरण अनुभवता यावे हा संस्थेचा उद्देश अधोरेखित करणारी सादरीकरणे या मैफिलीत झाली.

ज्येष्ठ कथक नृत्यांगना, गुरू विदुषी शमा भाटे, प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे, योगिनी मेडदकर, दादा तरंगे, नंदकिशोर राठी तसेच शीतल कोलवालकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. बनारस घराण्याच्या किशोरवयीन नर्तिका श्रीजा विश्वास यांच्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने दीपक मैफलीला प्रारंभ झाला. बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे आणि बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन असणारे शिवस्तुतीपर परण त्यांनी सादर केले. हे परण प्रसिद्ध ध्रुपदगायक पं. गुंदेचा यांनी रचले होते. त्यानंतर श्रीजा यांनी विलंबित तीनतालात उपज, उठान, आमद, घोडे की चाल (टुकडा), त्रिपल्ली, तोडा, रेला, लडी..यांतून कथकची प्रस्तुती केली. दमदार पदन्यास, डौलदार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, हे त्यांचे विशेष प्रत्ययास आले. रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, हा प्रसिद्ध दादरा सादर करताना, त्यांनी अभिनय आणि नृत्यातील भावपक्षाचे उत्तम दर्शन घडवले.

त्यानंतर उस्ताद अल्लारखा यांचे शिष्य पं.योगेश समसी यांचे अप्रतिम तबलावादन रंगले. झपतालाची सविस्तर मांडणी आणि त्रितालातील रचनांतून समसी यांनी तबला कसा आणि किती संवाद साधू शकतो, याची प्रचीती दिली. वादनातील स्पष्टता, समतोल, परिपक्वता यांचे दर्शन घडवत त्यांनी पेशकार, कायदा, रेला, टुकडा, चक्रधार, गत..यातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना यशवंत थिट्टे यांनी अनुरूप लेहेरा साथ दिली.
सुप्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर यांनी राग बागेश्री सादर केला. कौन गत भई ही पारंपरिक बंदिश, त्याला जोडून पं. नाथराव नेरळकर रचित पंचम सवारी तालात निबद्ध जावो सैया जावो, ही रचना आणि पं. दिनकर कायकिणी रचित देर ना लगाओ प्रीतम प्यारे, अशा रचना त्यांनी ढंगदारपणे प्रस्तुत केल्या. चैत मास बुलायले कोयलिया हो रामा, ही चैती आणि पश्तो तालातील दिलबहार, हा टप्पा झलक स्वरूपात ऐकवून अवघा रंग एक झाला, या भक्तिरचनेने त्यांनी या मैफिलीची सांगता केली. त्यांना सागर पटोकार (तबला), अभिनय रवंदे (हार्मोनियम), ओंकार दळवी (पखवाज) यांनी साथसांगत केली. श्रद्धा गद्रे, अनुराधा मंडलिक यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading