Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील पाणी कपातीवर पर्याय; ‘डेड स्टॉक’ वापरण्याची सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांची मागणी

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात बोलताना इनामदार यांनी म्हटले आहे की, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत टँकरच्या पाण्याचे दर वाढू लागल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहरातील बहुतांश मोठ्या इमारतींमध्ये जमिनीखाली अग्निशमनासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या असून, त्यातील पाणी आग लागल्याशिवाय वापरले जात नाही. अशा टाक्यांमधील साठ्याची एकत्रित गणना केल्यास तो जवळपास पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एका धरणाच्या साठ्याइतका असू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अग्निसुरक्षा क्षेत्राचा अभ्यास करताना आणि विविध आगीच्या घटनास्थळी भेटी दिल्यानंतर, प्रत्यक्षात आग विझवण्यासाठी फायर टँक तसेच रस्त्यांवरील फायर हायड्रंटमधील पाणीच वापरले जात असल्याचे निरीक्षण समोर आल्याचे इनामदार यांनी सांगितले.

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आग लागल्याच्या वेळी वेळ वाया जाऊ नये म्हणून फायर टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा टाक्यांमधील ‘डेड स्टॉक’ पाण्याचा नियंत्रित वापर करण्याबाबत प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. पुढील एक महिना हा साठा वापरण्यास सुरुवात केल्यास पाणी कपातीची तीव्रता कमी होऊन टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मागील  15 वर्षात शहर आणि उपनगरात, समाविष्ट गावांत ज्या सोसायट्या, मॉल आणि अन्य वास्तु निर्माण झाल्या आहेत, त्या सर्वांना फायर टँक बंधनकारक आहेत. यामुळे या सर्व पाणी साठयाचा एकत्रित विचार केला तर तो साठा अंदाजे चारशे कोटी लीटर म्हणजे आपल्याकडे असलेल्या धरण साठया एवढा असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाची दखल घेऊन प्रशासनाने तज्ज्ञांशी चर्चा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading