Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने बहरला

पुणे :सुहाना बसंत फाउंडेशनच्या वतीने आणि कन्नड संघ पुणे यांच्या सहयोगाने आयोजित, तसेच एफटीआयआय (FTII) पुणे यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेल्या प्रतिष्ठित ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या दिवसाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा महोत्सव भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII), पुणे येथील नवीन सभागृहात पार पडला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंतीमध्ये ‘मधुबन में शाम ने मुरली बजाई’ ही विलंबित बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘मै आऊँ तोरे मंदरावा’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सादर करून आपल्या कार्यक्रमाची सांगता एका मराठी भजनाने केली.

त्यांना ऋषिकेश जगताप (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), सिद्धेश्वर उंदळकर (पखवाज), तसेच शाश्वती चव्हाण, अभयसिंह वाघचौरे आणि श्रावणी विरोकर (तानपुरा, गायन आणि ताल) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पं. अभय रुस्तम सोपोरी यांचे संतूर वादन झाले. त्यांनी राग कौशिक रंजनीमध्ये आलाप, जोध आणि गत सादर केली. तसेच विलंबित झपताल आणि ‘सुन रे सजनवा मोरी’ ही एकतालातील बंदिश सादर करून द्रुत तीनतालाने आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला) यांनी साथसंगत केली.

दिवसाचा समारोप पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग  तिलक कामोद सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

महोत्सवाचा शेवटचा दिवस, म्हणजेच २१ जून रोजी (रविवार) सकाळी उस्ताद अरशद अली खान यांचे गायन होईल. त्यानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी (गायन) आणि पं. प्रवीण गोडखिंडी (बासरी) यांची जुगलबंदी होईल. सायंकाळच्या सत्रात अभिषेक बोरकर (सरोद) आणि मोहसिन खान (सितार) यांची जुगलबंदी होईल. त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार यांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची भव्य सांगता होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading