सितार पंचक व बहुरंग या वैशिष्ट्यपूर्ण नृत्याविष्काराने जिंकली रसिकांची मने
यावेळी एफटीआयआय पुणेचे कुलगुरू धीरज सिंह, कन्नड संघ, पुणेचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियन, सचिव मालती कलमाडी, धारवाड घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान, एफटीआयआयचे कुलसचिव
प्रतीक जैन , स्वित्झर्लंड येथील टेन्थपिन मॅनेजमेंट कन्सल्टंट्सचे भागीदार व संस्थापक मायकेल श्मिट तसेच सुहाना बसंत फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रईस खान आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात धारवाड घराण्यातील नामवंत सतारवादक उस्ताद छोटे रहिमत खान, उस्ताद रफीक खान, उस्ताद शफीक खान, रईस बाले खान आणि मन्सूर खान यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘सितार पंचक’ सादरीकरणाने झाली. त्यांनी राग मारू बिहाग मध्ये आलाप, जोड आणि चौतालातील गत तसेच राग सोहनी मधील तीनतालातील गत आणि झाला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाला तबल्यावर हेमंत जोशी आणि सोहम गोराणे यांनी समर्थ साथ दिली.
यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते निरुपमा आणि राजेंद्र तसेच अभिनव टीम, बेंगळुरू यांचा वैशिष्ट्यपूर्ण नृत्याविष्कार ‘बहुरंग’ सादर झाला. पुण्यात प्रथमच सादर झालेल्या या नृत्यरचनेत कथक, करणा आणि नाट्यशास्त्रातील हालचालींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, कला आणि तत्त्वज्ञानाचे वैभव विविध रंगछटांमधून प्रभावीपणे उलगडण्याचा एक उत्तम प्रयत्न केला गेला. ऊर्जा, उत्साह आणि अभिनव संकल्पनांनी परिपूर्ण अशा या नृत्यरचना आकर्षक वेशभूषा, नेत्रदीपक प्रकाशयोजना आणि विशेषतः या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या संगीतासह सादर करण्यात आल्या. या संगीताची निर्मिती प्रवीण राव, म्हैसूर मंजनाथ, प्रवीण गोडखिंडी आणि तरुण भट्टाचार्य यांनी केली आहे.
सदर महोत्सव येत्या २१ जूनपर्यंत असून संगीत रसिकांसाठी तो विनामूल्य खुला आहे. रविवारी सकाळच्या सत्रात उस्ताद अरशद अली खान, पं. जयतीर्थ मेवुंडी आणि पं. प्रवीण गोडखिंडी यांची गायन–बासरी जुगलबंदी सादर होईल. सायंकाळच्या सत्रात अभिषेक बोरकर आणि मोहसिन खान यांची सरोद–सितार जुगलबंदी होणार असून त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांच्या सादरीकरणांनी महोत्सवाचा भव्य समारोप होईल.
