शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धिबळ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य अधिक – डॉ. मकरंद वेलणकर यांच्या संशोधनाचा निष्कर्ष
या संशोधनामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या किशोरवयीन वयाच्या व्याख्येनुसार १० ते १९ वर्षे वयोगटातील ६१२ विद्यार्थी आणि ४७८ पालकांचा सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकडून माहिती संकलित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अनुभवांबरोबरच पालकांच्या निरीक्षणांनाही संशोधनात महत्त्व देण्यात आले. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचे लिंग, बुद्धिबळ खेळण्याचा कालावधी आणि प्रशिक्षणाची पद्धत या घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर बुद्धिबळामुळे मुलांमध्ये कोणत्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास होतो, याविषयी पालकांची मतेही नोंदविण्यात आली.संशोधनातील निष्कर्षांनुसार, एक वर्षापेक्षा कमी काळ बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत एक ते तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ नियमित बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक-भावनिक थकवा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले. मित्र, नातेवाईक किंवा सामाजिक माध्यमांद्वारे अनौपचारिकरीत्या बुद्धिबळ शिकणाऱ्यांच्या तुलनेत प्रशिक्षित मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धिबळ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य अधिक असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले.
पालकांच्या मतांच्या विश्लेषणातूनही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. नियमित आणि दीर्घकाळ बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता कमी होत असून धोरणात्मक विचार, सारासार निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, अंदाज बांधण्याची क्षमता आणि आत्मविश्वास अधिक प्रभावीपणे विकसित होत असल्याचे पालकांनी नमूद केले. विद्यार्थी जितका अधिक काळ बुद्धिबळाशी जोडला जातो, तितक्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक गुण वृद्धिंगत होत असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.
डॉ. वेलणकर यांनी यापूर्वी एम फिल करताना ‘बुद्धिबळाचा कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले होते. त्या संशोधनातील सकारात्मक निष्कर्षांमुळे बुद्धिबळाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील भूमिकेचा अधिक व्यापक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पीएचडीचा विषय निवडला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रबंध मराठी भाषेत सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत बुद्धिबळाचे विकासात्मक महत्त्व पोहोचावे, या उद्देशाने डॉ. वेलणकर यांनी मराठी भाषेची निवड केली.
डॉ. मकरंद वेलणकर म्हणाले, “आज बुद्धिबळाकडे प्रामुख्याने स्पर्धेचा खेळ म्हणून पाहिले जाते. मात्र माझ्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, योग्य प्रशिक्षणासह बुद्धिबळ आत्मसात केल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास, सारासार विचार करण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि सकारात्मक निर्णयक्षमता विकसित होते. प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बुद्धिबळाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘आत्मविकासासाठी बुद्धिबळ’ हा अभ्यासक्रम, ‘चेस थेरपी’ आणि ‘बुद्धिबळ साक्षर अभियान’ यांसारखे उपक्रम राबविणार असून विचारपूर्वक निर्णय घेणारी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी हे संशोधन समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.”
डॉ. वेलणकर यांनी ‘आत्मविकासासाठी बुद्धिबळ’ हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला असून ‘चेस थेरपी’ ही अभिनव संकल्पनाही विकसित केली आहे. हट्टीपणा, नैराश्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सकारात्मक विचारसरणी, एकाग्रता, स्लो लर्नर्सचा विकास, धांदरटपणा कमी करणे आणि ‘मी जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय ‘बुद्धिबळ साक्षर अभियान’, ‘चेस फॅमिली’ उपक्रम, शाळा, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन करण्याचाही त्यांचा मानस आहे.
डॉ. मकरंद वेलणकर हे पुण्यातील पहिले नॅशनल आर्बिटर असून बुद्धिबळ विषयावर पीएचडी करणारे पुण्यातील पहिले संशोधक आहेत. १९८६ मध्ये स्थापन झालेल्या वेलणकर चेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. तसेच बुद्धिबळ प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पहिल्या बुद्धिबळ जल्लोष चेस लीगचे आयोजन, खेळाडूंच्या हस्ते औषधी वृक्षारोपण, आदिवासी मुलांसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या शाळा भेटी, खेळाडूं साठी मेडिकल कार्ड, आदी विविध उपक्रमही त्यांनी राबविले आहेत.
