Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना टीडीएफची पुरस्कृत उमेदवारी

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टीडीएफचे पुणे विभाग समन्वयक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. उमेदवारांच्या मुलाखती आणि निर्धारित निकषांनुसार केलेल्या मूल्यमापनानंतर टीडीएफच्या निवड समितीने गावडे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही १९६५ मध्ये स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली राज्यातील जुनी शिक्षक संघटना आहे. आतापर्यंत टीडीएफच्या माध्यमातून २० ते २२ आमदारांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेने आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्ट रोजी टीडीएफच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये चार ते पाच उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या मुलाखतीत संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व कार्य आणि प्रभावीपणे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता या निकषांचा विचार करण्यात आला. त्यानंतर कौस्तुभ गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कौस्तुभ गावडे यांनी सांगितले की, “पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात यापूर्वी टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. या माध्यमातून सलग तीन टर्म टीडीएफचे आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. यामध्ये दोन वेळा सुरेश पाटील, तर एकदा ऐनापुरे यांनी आमदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात टीडीएफची मजबूत संघटनात्मक पार्श्वभूमी आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानातून ४० हजारांहून अधिक शिक्षक मतदारांची विक्रमी नोंदणी झाल्याचा दावा गावडे यांनी केला. टीडीएफने पुरस्कृत उमेदवारी दिल्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठीही आपली भूमिका अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

टीडीएफच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीत संघटनात्मक बळ मिळाले असून, शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading