Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्काराने ज्येष्ठ संस्कृत विद्वान डॉ. राधावल्लभ त्रिपाठी यांचा गौरव

पुणे  : नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्रातर्फे ५७वा संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी भूषविले.

या प्रसंगी भारतीय संस्कृत साहित्य, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रख्यात संस्कृत अभ्यासक डॉ. राधावल्लभ त्रिपाठी यांना “लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार”  कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल, लोकमान्य टिळकांचा पुतळा, मानपत्र व पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. डॉ. राधावल्लभ त्रिपाठी यांनी पुरस्काराला उत्तर देताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी वेद, ज्योतिष तसेच संस्कृतसंबंधी केलेल्या कार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.

संस्कृत दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC) परीक्षेत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करणाऱ्या विविध शाळांतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना संस्कृत विषयाच्या अध्ययनासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी केले.

संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून भारतीय ज्ञानपरंपरेचे मूळ अधिष्ठान आहे. नवीन युगामध्ये संस्कृतचे जतन आणि प्रसारासाठी सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी प्रसंगी व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच अधिष्ठाता प्रा. मंजूषा गोखले यांनी आभार मानले. डॉ. अंबरीष खरे व डॉ. अमृता नातू यांनी परिचय करून दिला. उन्मेष जोशी यांनी डॉ. राधावल्लभ त्रिपाठी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. प्रथमेश बिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. शर्वरी एरंडे यांनी मंगलाचरण तसेच संस्कृतमंदाकिनी गीताचे गायन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading