‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. 5: “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चित काळजीची गोष्ट असली तरी, मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबईतील महापालिका उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व पालिका अधिकाऱ्यांच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,प्रधान सचिव, सार्व. आरोग्य विभाग प्रदीप व्यास, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारसू यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत आहे हे लक्षात घेवून कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी गणपती, मोहरम अत्यंत संयमाने साजरे केले इथून पुढेही हाच संयम नागरिकांनी बाळगावा.
मोहिमेत सर्वाना सहभागी करा
चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करुन घ्या.
जम्बो सुविधा उत्कृष्ट
कोरोना ट्रॅकिंग ट्रेसिंग अधिक वेगाने वाढवावे लागेल. जंबो रुग्णालये तात्पुरती आहेत या गैरसमजातूनही लोकांनी बाहेर यावे. डायलिसीस आयसीयूच्या सुविधा देण्याबाबतीतही मुंबई मागे राहिली नाही. आरोग्य हीच आताच्या घडीला प्राथमिकता आहे. परप्रांतीय मजूर परतत आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे.
ऑक्सिजनची वाढती गरज
सध्या आपण मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसेच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे. ही वाढ अशीच राहिली तर बेड, ऑक्सीजनची कमतरता जाणवेल तशी वेळ येवू न देणे आपल्या सर्वांच्या हाती आहे. मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे.
“माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या अभियानाद्वारे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छेवर भर देवून वाढती संख्या रोखत कोरोनावर नियंत्रण मिळवायला हवे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे. श्रावणात मलेरिया, डेंग्यूची साथ वाढण्याचा धोका लक्षात घेवून पालिका प्रशासनाने तत्पर असावे, अशा सूचना केल्या.
कोविड पश्चात उपचारांसाठी ओपीडी
कोविडपश्यात रुग्णांचे वर्गीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, रुग्णांचा कोविडनंतरचा डेटा तयार केल्यास यावर नेमकी उपाययोजना राबविणे सोपे जाईल, कोरोनाकाळातील औषधोपचाराचे नेमके परिणाम मानवी शरीरावर कसे झाले आहेत हे स्पष्ट होवून पुढील उपचारपद्धतीत सुधारणा करता येईल. रुग्णालये, प्रशसानाने त्यादृष्टीने पावले उचलावित, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सुविधा नव्हे रुग्ण सेवा द्या
औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्ण सेवा आवश्यक आहे. यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो नुसते बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही, रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊले टाका आपण कुठे कमी पडतो, आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल याचा विचार झाल्यास कोरोनावर नियंत्रण मोठी बाब नसल्याचे सांगत आजपर्यंत कोरोना नियंत्रणासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना धन्यवाद दिले. कोरोना काळात जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
