fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

”झेंडे अटकेपार” – विविध देशातील मराठी भाषिक बांधवांच्या कर्तृत्वाची दैदिप्यमान यशोगाथा

विश्व मराठी परिषदेने ७ ते १५ सप्टेंबर, (संध्याकाळी ५ ते ६.१५ (भारतीय प्रमाण वेळ)) यादरम्यान  झेंडे अटकेपार… ही युट्युब लाईव्ह मालिका मालिका आयोजित केली आहे.

या मालिकेमध्ये ९  देशांतील (युनाइटेड किंग्डम , ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी, चीन, हॉंगकॉंग, न्यूझीलंड) मान्यवर वक्ते  सहभागी होत आहेत. हे वक्ते त्यांच्या देशात किमान १५ हून अधिक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभरातील किमान तीस देशांमधील मराठी बांधव एकत्र येतील असे अपेक्षित आहे.

ऐतिहासिक काळात अटकेपार झेंडे ही मराठी माणसांच्या कर्तृत्वाची अंतिम सीमारेखा होती. मात्र २१ व्या शतकात अटकेपार झेंडे ही संकल्पना अधिक व्यापक झाली आहे. महाराष्ट्राच्या, देशाच्या पलीकडे जाऊन  मराठी भाषिक बांधवांनी गेल्या काही दशकांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात विविध देशांमध्ये जाऊन उद्योग, व्यवसाय, साहित्य, संस्कृती, सेवा, वैद्यकीय, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, आय टी, बौद्धिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बजावली आहे. आपल्या कर्तृत्वाची पताका उंचावली आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा मान आणि सन्मान वाढविला आहे.

आपल्या कर्तृत्वाने यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करीत असताना त्यांना आपल्या मातीपासून दूर जावे लागले, हजारो किलोमीटरचे अंतर पडले तरी आपल्या मराठी संस्कृतीशी, मराठी मातीशी त्यांची नाळ कायमची जोडलेली आहे असा त्यांचा अनुभव आहे. अटकेपार झेंडे रोवताना फक्त आपले कर्तृत्वच नाही तर आपली माणसे, आपले संस्कार, आपली शाळा, आपले बालपण, आपली माती, आपला वारसा याबद्दल  त्यांच्या अंत:र्मनात सातत्याने अभिमान आणि कृतज्ञता  जागृत असते.

याचा विचार करून जगभर पसरलेल्या मराठी बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने झेंडे अटकेपार ही युट्युब लाईव्ह मालिका आयोजित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून सामूहिक मराठी मनास आणि विशेषतः युवा पिढीला मोठया प्रमाणावर प्रेरणा मिळेल, उत्तेजन मिळेल.

मराठी जगतामध्ये आमूलाग्र बदल घडवून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोट्यावधी मराठी बांधवांमध्ये एक भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक, भावनिक आणि उद्योजकिय सहकार्याचा सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून भावी पिढीसाठी एक अलौकिक वारसा निर्माण करणे, असे क्रांतिकारी स्वप्न ‘विश्व मराठी परिषद’ पाहत आहे. त्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी उचललेले हे एक पाऊल आहे, असे प्रतिपादन विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.

झेंडे अटकेपार या युट्युब कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विश्व मराठी परिषदेच्या विश्व मराठी वाणी या युट्युब चॅनेलला भेट द्यावी असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या उपक्रम समन्वयक कल्याणी कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  +९१९०४९८३३३२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

युट्युब चॅनेल लिंक –
https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani
७ ते १५ सप्टेंबर, संध्याकाळी ५ ते ६.१५ (भारतीय प्रमाण वेळ)


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading