Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्रात ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे  : महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि विविध भागांत निर्माण झालेल्या वाऱ्यांच्या द्रोणीय रेषेमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण राज्यात पावसाची व्याप्ती वाढू शकते. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, दक्षिण कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या भागांवर या हवामान प्रणालीचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण, ऊन-सावल्यांचा खेळ आणि काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
३ ते ५ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित असलेला पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, जलसाठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading