औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचे स्पष्टीकरण; आरोपांवर तथ्यांच्या आधारे निर्णय घेण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भिमनवार यांनी घटनेची नेमकी कालमर्यादा आणि आपल्या पदभाराची तारीख स्पष्ट केली.
भिमनवार यांच्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६मध्ये घडली. मात्र, त्यांनी MPSC अध्यक्षपदाची शपथ १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली असून, प्रत्यक्ष पदभार ३ मार्च २०२६ रोजी स्वीकारला. त्यामुळे संबंधित घटना त्यांच्या पदभार स्वीकारण्यापूर्वीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भविष्यात परीक्षेच्या प्रक्रियेत अशा घटना घडू नयेत, यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
याशिवाय परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती नेमली आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे भिमनवार यांनी सांगितले.
आपल्यावरील आरोपांचे मूल्यमापन करताना केवळ राजकीय किंवा सार्वजनिक चर्चेच्या आधारावर निष्कर्ष काढण्याऐवजी वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि उपलब्ध पुरावे यांचा आधार घेतला पाहिजे, असेही भिमनवार यांनी स्पष्ट केले.
