वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र पुढील पिढीकडे सोपवावा : स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील
पुणे : निसर्ग जपला असता तर मास्क लावून निसर्गापासून तोंड लपविण्याची वेळ आपल्यावर आली नसती. निसर्गाची जपणूक करताना पाण्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र जपून तो पुढील पिढीकडे सोपवावा, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केले. पर्यावरण रक्षण आणि आरोग्य साक्षरतेतून राष्ट्रभक्तीची जपणूक करणार्या अशा छोट्या संमेलनांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना महिला सक्षक्तीकरणात दिलेल्या योगदानासाठी तर पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर यांना समाजसेवेबद्दल जीवनगौवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी मोहिते पाटील बोलत होत्या. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे आणि समारोप सत्राचे अध्यक्ष विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. संमेलनाचे संयोजक ट्रस्टचे विश्वस्त, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, धर्मादाय सहआयुक्त सु. मु. बुक्के, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, अॅड. नंदिनी शहासने, डॉ. जयश्री तोडकर आदी व्यासपीठावर होते. मानपत्राचे वाचन माया प्रभुणे आणि चंद्रकांत शहासने यांनी केले. डॉ. तोडकर यांच्या वतीने डॉ. जयश्री तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभात बोलताना अनंत ताकवाले म्हणाले, मानवासह संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनली आहे. आपल्यावर त्यांचे ऋण आहे. या ऋणांची परतफेड करण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही सुद्धा राष्ट्रभक्तीच आहे. आपल्या कृषीप्रधान देशात उद्योगशिलतेलाही महत्त्व आहे. उद्योगशीलतेचे महत्त्व शिक्षणाद्वारे जो पर्यंत सांगितले जात नाही तो पर्यंत श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. ज्या वेळी श्रममूल्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न होतील त्या वेळी समानता प्राप्त होईल. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रशस्तीपत्र वाटप ज्येष्ठ विचारवंत श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या विषयी काम करणार्यांना धर्मादाय सहआयुक्त सु. मु. बुक्के यांनी मार्गदर्शन केले. समारोप सोहळ्यानंतर बाबासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Read More