बार्टीच्यावतीने नागपूर येथे प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) नागपूर येथील सामाजिक न्याय भवन केंद्रामध्ये उद्योजकता विकास, स्पर्धापरीक्षा, परदेशी भाषा, सॉफ्ट स्कील्स, प्लास्टिक प्रोसेसिंग टेक्निक, पॉली हाऊस व शेडनेट मॅनेजमेंट या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत.
एमसीईडी या संस्थेमार्फत उद्योजकता विकास प्रेरणा ३ दिवसीय कार्यशाळा तर उद्योग संधी प्रेरणा कार्यक्रम ६ तासांचा होणार आहे. तसेच स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन आणि सिपेट संस्थेच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रत्येकी ३ तास व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सिपेट संस्थेमार्फत प्लास्टिक प्रोसेसिंग टेक्निक या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा होणार आहे. परदेशी भाषा मार्गदर्शन व्याख्यान, सॉफ्ट स्कील्स मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार विविध विषयांवर मार्गदर्शन, वेबिनार प्रत्येकी २ तासांचे होणार आहे. राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमार्फत (एनआयपीएचटी) २ दिवसीय जनरल पॉली हाऊस व शेडनेट मॅनेजमेंट कार्यशाळा होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला अर्ज ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भरावा असे आवाहन बार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
