Friday, October 30, 2026
Latest NewsPUNE

नानासाहेब पेशवे यांच्या समाधी परिसराची स्वच्छता मोहीम उत्साहात

 

विविध हिंदुत्ववादी संघटनांचा श्रमदानात सहभाग; ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प

पुणे : हिंदवी साम्राज्याचे पंतप्रधान श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी साप्ताहिक पूजा सेवेकरी यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत पुण्यातील विविध सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या सामूहिक प्रयत्नांमुळे समाधी परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.

या मोहिमेत पुण्येश्वर पुनर्निर्माण समिती, विश्व हिंदू परिषद, पतित पावन संघटना, जिथे कमी तिथे आम्ही, वीर लहुजी परिषद, भगवे ट्रेकर्स, स्वराज्य रक्षक दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, समस्त हिंदू आघाडी आणि स्वस्तिक फाउंडेशन या संघटनांनी सहभाग घेतला. श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड यांनीही विशेष सहकार्य केले.

या वेळी नगरसेवक कुणाल टिळक उपस्थित होते. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी नानासाहेब पेशवे यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती दिली. त्यांच्या कारकिर्दीत अटक ते कटकपर्यंत हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. तसेच पुणे शहराच्या विकासातही नानासाहेब पेशवे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, असे त्यांनी सांगितले.

इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची झालेली दुरवस्था ही चिंतेची बाब असून, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

या मोहिमेचे आयोजन श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी साप्ताहिक पूजा सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले. अक्षय राऊत, वेदांग कानडे, यश काळभोर, संकेत मेहेंदळे, मिहिर साल्पेकर आणि तुषार धनीपकर यांनी मोहिमेसाठी पुढाकार घेतला.

Leave a Reply