Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

करमणुकीच्या पलीकडे नेणार्या कलात्मक रंगभूमीची दिशा अपेक्षित

 

श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावरील परिसंवादात उमटला सूर

पुणे  – मराठी रंगभूमीची मुख्य धारा करमणुकीच्या चौकटीत रमली आहे. मात्र, मानवी जगणे समजून घेण्याच्या प्रक्रियेकडे रंगभूमीची वाटचाल होणे अपेक्षित आहे. स्मृतिरंजनापलीकडे जाऊन, नव्या काळाची आव्हाने पेलणार्या कलात्मक रंगभूमीची दिशा आता अपेक्षित आहे, असा सूर गुरुवारी रंगभूमीविषयक परिसंवादात येथे उमटला.

पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे गुरुवारचे सत्र ‘मराठी रंगभूमी : काल, आज उद्या’ या विषयावर झाले. एकूण चार सत्रांमध्ये झालेल्या या परिसंवादात स्पर्धा रंगभूमी, अव्यावसायिक, व्यावसायिक आणि उद्याची रंगभूमी असे विषय केंद्रस्थानी धरून चर्चा झाली. त्यामध्ये इरफान मुजावर, डाॅ. अनिल बांदिवडेकर, हेमंत एदलाबादकर, हिमांशु स्मार्त, पराग घोंगे, दिलीप जगताप, शेखर ढवळीकर, क्षितिज पटवर्धन, चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम बेर्डे, इरावती कर्णिक आणि चंद्रशेखर फणसळकर यांनी भाग घेतला.

पहिल्या सत्रात स्पर्धा रंगभूमीच्या संदर्भात पारितोषिक महत्त्वाचे की आनंद महत्त्वाचा, असा मुद्दा उपस्थित करून युवा रंगकर्मींना प्रशिक्षित होण्यास साह्य करणार्या स्पर्धात्मक रंगभूमीची आवश्यकता अधोरेखित झाली. अव्यावसायिक रंगभूमीवरील चर्चेत प्रस्थापित साचे तोडण्यावर भर दिला पाहिजे आणि नव्या तसेच वेगळ्या पद्धतीने प्रयोग करून पाहण्याची गरज आहे. मात्र, ही प्रक्रिया संथ असल्याचे मत व्यक्त झाले.
व्यावसायिक रंगभूमीची मुख्य धारा प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता, यांच्या हातात हात घालून चालण्याच्या प्रयत्नांत दिसते आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता बाजारपेठाही काबीज करण्याची अपेक्षा व्यावसायिक रंगभूमीकडून केली जात असल्याने जबाबदारी सतत वाढती असल्याचे भान आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला.

शेवटच्या सत्रात मराठी रंगभूमीच्या भावी काळाविषयी चर्चा रंगली. सर्वार्थाने दमदारपणा असलेला नाटककार नसणे, तत्त्वज्ञानात्मक सांस्कृतिक कृती नसल्याचे वास्तव, त्याच चौकटीत फिरत राहिल्याची भावना, करमणूक प्राधान्य, जगणं समजून घेण्याची प्रक्रिया बाजूला पडणे, समीक्षक नसल्याचे वास्तव, सर्वसमावेशक दृष्टीकोनाचा अभाव, कलाविषयक दर्जेदार नियतकालिकांचा र्हास..अशा मुद्द्यांना या सत्रात स्पर्श करण्यात आला. कुठल्याही घटनेचे प्रतिक्रियात्मक सादरीकरण, कलेचे मूल्यमापन करण्यापेक्षा कलाकारांच्या माहितीत रस…अशा घटकांवरही मान्यवरांनी विचार मांडले. मात्र, उद्याची रंगभूमी वेगाने होणारे बदल सामावून घेत नव्या उर्जेने, प्रतिभेने, तंत्रस्नेह स्वीकारून मूळची प्रयोगशीलता जपणारी असेल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.

प्रसिद्ध रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी या संपूर्ण परिसंवादाचे संचलन केले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading