‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात अधिक मासा निमित्त ‘चतुर्वेद स्वाहाकार’
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली आयोजन
पुणे : ब्रह्मणस्पती सूक्त होम, ऋग्वेद संहिता स्वाहाकार, कृष्ण यजुर्वेद स्वाहाकार, सामवेद स्वाहाकार, अथर्ववेद स्वाहाकाराचे आयोजन ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात करण्यात आले. अधिक मास अर्थात ढुंढिराज मासाच्या निमित्ताने मंदिरात ‘चतुर्वेद स्वाहाकार’ संपन्न होत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित ‘चतुर्वेद स्वाहाकार’ अंतर्गत ब्रह्मणस्पती सूक्त होम शुभारंभ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व संगीता रासने यांच्या हस्ते झाला होता. वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली दररोज दुपारी १ ते सायं. ७ दरम्यान मंदिरात ‘चतुर्वेद स्वाहाकार’ सुरु आहे. रविवार, दि. ३१ मे रोजी धुंडीविनायक पौर्णिमेला पूर्णआहुती, महाआरती व सांगता होणार आहे
गाणपत्य संप्रदायामध्ये ज्योतिष शास्त्राशी संबंधित भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्री ढुंढिराज अवतार. महाराजा दिवोदास नामक राजाच्या उद्धारासाठी झालेला आणि भगवान श्री शंकरांच्या द्वारे पूजन संपन्न झालेला हा दिव्या अवतार. आजही काशी क्षेत्रामध्ये भगवान श्री विश्वनाथ यांच्या मंदिरासमोर त्यांनी पूजन केलेले भगवान ढुंढिराज विद्यमान आहेत. विश्वनाथाच्या दर्शनाच्या आरंभी त्यांच्या दर्शनाची, वंदनाची परंपरा आहे. त्यांच्या उपासनेचे विशेष महत्व असल्याने या महिन्याला गाणपत्य संप्रदायात ढुंढिराज मास म्हणतात. या काळात श्री गणेश विग्रहाची पूजा, श्री गणेशाना दुर्वार्चन, गणेश ग्रंथाचे पारायण, गणेश मंत्र जप याला विशेष महत्व आहे. त्यामुळे मंदिरात ‘चतुर्वेद स्वाहाकार’ आयोजित करण्यात आला.
