‘कल्याणी स्टील्स’च्या अध्यक्षपदाची सूत्रे अमित कल्याणी यांच्या हाती
पुणे : अभियांत्रिकी क्षेत्रासाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टील तयार करणाऱ्या ‘कल्याणी स्टील्स लिमिटेड’ने आज अमित कल्याणी यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. ही नियुक्ती २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कामकाज संपल्यानंतर लागू होईल. कंपनीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब कल्याणी यांनी कंपनीच्या स्थापनेपासून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता नेतृत्वात नियोजनबद्ध बदल करण्यात येत आहे. कल्याणी स्टील्स हा कल्याणी ग्रुपचा भाग आहे.
‘कल्याणी स्टील्स लिमिटेड’चे नियोजित अध्यक्ष अमित कल्याणी म्हणाले, “कल्याणी स्टील्सची उभारणी सुरुवातीपासूनच अत्यंत कठोर गुणवत्ता निकष पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अचूकतेवर भर देण्याची ही परंपरा हीच आमची सर्वांत मोठी ताकद आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता अधिक पर्यावरणपूरक, प्रगत आणि जागतिक दर्जाच्या सामग्रीची गरज आहे. त्यामुळे ग्रीन स्टील, प्रगत सामग्री आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मदतीने कामकाज करण्यावर आम्ही अधिक भर देऊ. महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रांमध्ये आणि जागतिक बाजारपेठांमध्ये व्यवसायाचा विस्तार करू. तसेच, भारतीय स्टील उद्योगासाठी नवे मापदंड निर्माण करू.”
“काळानुसार नेतृत्वात बदल होत राहिले, तर संस्था दीर्घकाळ टिकतात,” असे डॉ. बाबासाहेब कल्याणी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अमित यांनी कंपनीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे कंपनीच्या विकासाच्या धोरणाला मोठी मदत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याणी स्टील्स आपला पाया अधिक भक्कम करेल आणि उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.”
अमित कल्याणी हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ कल्याणी ग्रुपच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक या पदांवरून त्यांनी ग्रुपचा व्यवसाय एअरोस्पेस, संरक्षण, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत सामग्री या क्षेत्रांत विस्तारला आहे. ‘कल्याणी स्टील्स’चे व्यवस्थापकीय संचालक आर. के. गोयल यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. कंपनीच्या विकासाचे धोरण ठरवण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सुरुवातीला भारत फोर्जला लागणारे स्टील पुरवणारी कंपनी म्हणून कल्याणी स्टील्सची सुरुवात झाली. आता ती भारतातील आणि जागतिक बाजारपेठेतील वाहन उद्योग, औद्योगिक क्षेत्र आणि महत्त्वाच्या उद्योगांना स्टील पुरवणारी नामांकित कंपनी बनली आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न १९८४ मध्ये १९.२ कोटी रुपये होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ते वाढून १,९०२ कोटी रुपये झाले.
डॉ. कल्याणी संचालक मंडळाला यापुढेही मार्गदर्शन करीत राहतील. उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कामाच्या माध्यमातून देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे ग्रुपचे ध्येय त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे नेले जाईल.
