कर्वेनगर येथील बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करण्यासाठी आपचे आंदोलन
पुणे:आज आम आदमी पक्षाच्या वतीने विकास चौक कर्वेनगर येथे बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
कर्वेनगर परिसरामध्ये असलेल्या भाजी मंडई, दुकानदार, हॉटेल येथील विक्रेते, ग्राहक तसेच नागरिकांसाठी महिलांसाठी विकास चौक कर्वेनगर येथे असलेले सुस्थितीतील सार्वजनिक शौचालय हे सोयीचे असून देखील गेल्या काही महिन्यांपासून या सार्वजनिक शौचालयाला टाळे लावण्यात आले आहे. हे शौचालय सुरू करावे यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने सहाय्यक आयुक्तांकडे विचारणा केली असता सदर सार्वजनिक शौचालय महिला व बालकल्याण समिती ठराव क्रमांक 40 (दिनांक ९/९/२०२०) अनुसार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पत्र महानगरपालिकेने आम आदमी पक्षाला दिले आहे.
स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून हेतूपुरस्सर हे सार्वजनिक शौचालय पाडण्याचा आणि ही जागा हडपण्याचा डाव आखला आहे. पुणे शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांची संख्या अपुरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची गरज असताना चालू स्थितीतील सार्वजनिक शौचालय बंद करून पाडण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मध्ये सह्यांची मोहीम सुरु केली असून असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे.
आजच्या या आंदोलनामध्ये डॉ अभिजीत मोरे (कोथरुड विधानसभा अध्यक्ष), प्रा सुहास पवार (कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष), सुशील बोबडे (कर्वेनगर वॉर्ड कार्याध्यक्ष), सुजित अगरवाल (कोथरूड विधानसभा खजिनदार), रोहन रोकडे (कोथरुड वॉर्ड कार्याध्यक्ष), घनश्याम मारणे, विक्रम गायकवाड (मुळशी विधानसभा अध्यक्ष), किशोर मुजुमदार, ऋषिकेश मारणे, यश खेतान, किर्तीसिंग चौधरी, अविनाश सावंत, दत्तात्रय भांगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
