fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘प्रभातस्वर’ मैफलीद्वारे नूतनवर्षात गानरसिकांना मिळणार सांगितीक भेट : पं. शौनक अभिषेकी यांचे होणार गायन

पुणे : प्रथितयश कलाकारांचे गायन, वादन आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद असा दुग्धशर्करा योग ‘प्रभातस्वर’ मैफलीत जुळून येतो. नव्या वर्षाच्या पहिल्या रविवारी (दि. 2 जानेवारी 2022) युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे पंडित शौनक अभिषेकी यांची मैफल आयोजित करण्यात आली असून आग्रा व जयपूर घराण्याच्या गायकीचा सुंदर मिलाफ गानरसिकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. गीतातील आशय, रचनेतील भावोत्कटता-संवेदनशीलता जपण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या गायकीत रसिकांना अनुभवण्यास मिळेल.
ही मैफल सकाळी 7:00 वाजता नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातील ज्ञानवृक्षाखालील मोकळ्या जागेत होणार असल्याची माहिती अपर्णा केळकर यांनी निवेदनाद्वारे दिली. अभिषेकी यांना मंगेश मुळे (तबला) तर मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) साथ करणार आहेत. प्रसिद्ध निवेदिका मंजिरी धामणकर या कलाकारांशी संवाद साधणार आहेत.

विख्यात गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व शिष्य पं. शौनक अभिषेकी यांनी स्वत:च्या गायकीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात युवा पिढीतील आश्वासक गायक म्हणून स्वत:चा ठसा उमटविलेला आहे. वडील पं. जितेंद्र अभिषेकी तसेच जयपूर घराण्याच्या गायिका श्रीमती कमल तांबे यांच्याकडून पं. शौनक यांना तालीम प्राप्त झाली आहे. त्यांंच्या गायनात आग्रा व जयपूर घराण्याच्या गायकीचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
आपल्या गुरूंकडून मिळालेला सांगितीक वारसा जपत असतानाच पं. शौनक यांना संगीतातील नवीन आयाम शोधणे विशेषत्वाने आवडते. जागतिक संगीत क्षेत्रातील विविध शैलींना बरोबर घेऊन भारतीय संगीत क्षेत्रात अनेक प्रयोग करण्याच्या कौशल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज कलांकरांसह सादरीकरणाची संधी प्राप्त झाली आहे.

मार्च 2019 मध्ये ‘प्रभातस्वर’ मैफलीच्या आयोजनास सुरुवात झाली. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 2020 मध्ये मैफल आयोजित करण्यात खंड पडला. जानेवारी 2021च्या पहिल्या आठवड्यात मैफलीचे आयोजन केले गेले. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये आयोजित केलेल्या मैफलीत रसिकांना प्रभातस्वरची अनुभूती घेता आली.

‘प्रभातस्वर’ या प्रभातकालीन मैफलीत आतापर्यंत युवा पिढीतील प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी, पंडित कुमार गंधर्व आणि मुकुल शिवपुत्र यांचा समृद्ध वारसा लाभलेले प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली, जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका पंडिता मंजिरी असनारे-केळकर, राजस्थानमधील सिकर घराण्याचे प्रसिद्ध युवा सारंगीवादक साबीर सुलतान खान, जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर तसेच प्रसिद्ध गायिका पंडिता अश्विनी भिडे-देशपांडे आणि विख्यात ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांचे सादरीकरण झाले आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासकीय निर्बंधांचे पालन करून होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading