Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भास्कर जाधव यांनी पक्ष नेतृत्वाला दिला घरचा आहेर, कार्यपद्धती सुधारण्याचाही सल्ला


मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)चे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली आहे. पक्षातून नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडत असल्याबद्दल सतत खंत व्यक्त करण्यापेक्षा संघटनात्मक बदल करून नव्या उमेदीने पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला.

जाधव म्हणाले की, पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी देण्यावर भर दिला पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रियपणे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वावरावे, तसेच वरिष्ठ नेत्यांनी नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षात केवळ होयबा करणाऱ्यांपेक्षा सक्षम, अभ्यासू आणि स्पष्ट मत मांडणाऱ्या लोकांना स्थान मिळाले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना जाधव यांनी सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले. अनेक नेते विकासकामे, तपास यंत्रणांचा दबाव किंवा इतर अडचणींमुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे राजकीय दबावाची भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाही संस्थांची स्वायत्तता कमी होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

तपास आणि कारवाईच्या संदर्भात छगन भुजबळ, संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा नेत्यांची उदाहरणे देत त्यांनी आरोप केले की, अनेक प्रकरणांमध्ये मोठमोठे आरोप झाले, मात्र त्यांची न्यायालयीन पातळीवर सिद्धता झालेली नाही. त्यामुळे काही नेते मानसिक आणि राजकीय दबावाला कंटाळून सत्ताधाऱ्यांच्या गोटात जात असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदारांच्या संभाव्य गटबाजीबाबत बोलताना जाधव यांनी यासंदर्भातील कायदेशीर प्रश्न पुढे येऊ शकतात, असे सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाला भूमिका स्पष्ट करावी लागेल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढील राजकीय वाटचालीचा विचार करावा, असा सल्ला देताना जाधव म्हणाले की, पक्षातील घडामोडींसाठी केवळ एका बाजूला दोष देऊन चालणार नाही. “टाळी एका हाताने वाजत नाही, चुका दोन्ही बाजूंनी होतात,” असे सांगत त्यांनी पक्ष नेतृत्वासह सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading