fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

‘स्वरपर्व’ कार्यक्रमात यंदा युवा कलाकारांची मांदियाळी

पुणे : नवीन वर्षाचे स्वागत नव्या दमाच्या आश्वासक स्वरांनी करण्याची संधी यंदा पुणेकर संगीत रसिकांना मिळणार आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे पुढे नेवू पाहणाऱ्या तरुण कलाकारांचा कलाविष्कार येत्या २ जानेवारीला आयोजित करण्यात येणाऱ्या ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येईल. पुण्यातील तालानुभूती फाउंडेशन तर्फे रोहन बिल्डर्स यांच्या सहकार्याने आयोजित सदर कार्यक्रम मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या आवारातील एमईएस सभागृहात संपन्न होणार असून कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ४:३० अशी आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तो दिला जाईल. कोरोना संबंधी राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

कार्यक्रमाविषयी माहिती देताना तालानुभूती फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध तबलावादक रोहित मुजुमदार म्हणाले, “उदयोन्मुख व प्रतिथयश कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना एकाच रंगमंचावर अनुभवता यावा यासाठी आम्ही ‘स्वरपर्व’ हे व्यासपीठ निर्माण केले. परंतु यंदाच्या कार्यक्रमात फक्त उच्च क्षमतेच्या तरुण कलाकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व प्रमुख आणि साथसंगतीला असणाऱ्या कलाकारांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे. त्यामुळे सादरीकरणादरम्यान एक वेगळीच उर्जा कार्यक्रमस्थळी असलेल्या वातावरणात असेल.”
कार्यक्रमाच्या प्रमुख कलाकारांमध्ये ईशान घोष (तबला सोलो), मेहताब अली नियाझी (सतार) आणि विराज जोशी (गायन) यांच्या समावेश आहे. त्यांना साथ करतील आशय कुलकर्णी (तबला), सौरभ क्षीरसागर (तबला), अभिषेक शिनकर (हार्मोनियम), स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम) आणि शिवाजी डाके (तालवाद्य). 
भेंडी बाजार मोरादाबाद घराण्याचे २४ वर्षाचे तरुण सतार वादक मेहताब अली नियाझी हे प्रसिद्ध सतार वादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे सुपुत्र व शिष्य आहेत. त्यांनी वयाच्या ४ थ्या वर्षापासून सतार वादनाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी आपला पहिला कलाविष्कार पंडीत बिरजू महाराज याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सादर केला आणि रसिकांची वाहवा मिळवली.

किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे १८ वर्षीय नातू व श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र विराज जोशी यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांचे वडील पंडित श्रीनिवास यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. विराजने आजवर देशातील १०० हून अधिक तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित २५ हून अधिक कार्यक्रमांमध्ये आपली गायन कला सादर केली आहे. षण्मुखानंद सभा मुंबई यांच्या तर्फे देण्यात येणारी डॉ. एम एस. सुब्बूलक्ष्मी शिष्यवृत्ती विराज यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते प्रदान करण्यात आली होती.

मोठी संगीत परंपरा लाभलेल्या घोष घराण्यातील सर्वात तरुण कलाकार ईशान घोष हे प्रसिद्ध सतार व तबला वादक पंडित नयन घोष यांचे सुपुत्र व शिष्य असून फरुखाबाद घराण्याचे उदयोन्मुख तबला वादक आहेत. २० व्या शतकातील प्रसिद्ध तबला वादक पद्मभूषण पंडित निखिल घोष यांचे नातू असलेले २१ वर्षीय ईशान घोष यांना आजवर शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकरांची साथ करण्याचे भाग्य लाभले आहे. सुप्रसिद्ध बासरी वादक पन्नालाल घोष हे त्यांच्या वडिलांचे काका होत. मध्यप्रदेश सरकार तर्फे दिला जाणारा बाबा अल्लाउद्दीन खान युवा पुरस्कार, अध्यक्ष जीमी कार्टर पुरस्कार आणि द रायझिंग स्टार अवॉर्ड आदी पुरस्कार आजवर ईशान यांना मिळाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading