‘रिपाइं’ला पुणे महानगरपालिकेत महापौर पद मिळावे – रामदास आठवले
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत भाजप आणि रिपाइंची एकत्र युती आहे. पण अजून एकदाही रिपाइंला महापौर पद मिळालेले नाही. त्यावर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत रिपाइं ला पुणे महानगरपालिकेतील महापौर पद मिळावे यासाठी आमचा आग्रह असेल, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
यावेळी रिपब्लीकन पार्टीचे केंद्रिय सचिव आत्माराम पाखरे , आर पी आय चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, आर पी आय फेडरेशन राष्ट्रीय निमंत्रक तथा कायदेशीर सल्लागार ॲड. मंदारभाऊ जोशी, फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांबळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
शौर्य दिनी गर्दी टाळावी
येत्या 1 जानेवारीला भीमा कोरेगावला शौर्य दिन साजरा होत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे जास्त गर्दी करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले. ते म्हणाले, ज्यांना यायचे आहे त्यांनी गर्दी न करता दर्शन घ्यावे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा परिसर प्रेरणास्थळ म्हणून विकसीत होणार आहे. यासाठी शासनाने विजयस्तंभा जवळील 20 हेक्टर जमीन जागा मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.
… तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना आठवले म्हणाले ,उद्धव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. पण अनेक दिवस राज्याला मुख्यमंत्री नसने बरोबर नाही, जोवर उद्धव ठाकरे येत नाहीत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे.
गो महाविकास आघाडी गो…
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आठवले म्हणाले, मी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गो करोना गो असा नारा दिला होता. तो नारा जगभरात प्रसिद्धही झाला होता. आता मी म्हणतो की, गो महाविकास आघाडी गो..’, असा माझा नारा आहे.
त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी
कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधींविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, साधू संतांनी महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरू नये, असे कोणी केले असल्यास त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करावी.
