अखिल भारतीय मराठी नियतकालिकांच्या संघटनेची स्थापना

पुणे : मराठी भाषेतील नियकालिकांसमोरील विविध स्वरुपातील समस्या सोडवण्यासाठी अनौपचारिक स्वरुपात गेली काही वर्षे कार्यरत असणार्‍या मंडळींच्या पुढाकाराने आता पुण्यात अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांची निवड करण्यात आली असून सचिव म्हणून भालचंद्र कुलकर्णी (संपादक – सहकार सुगंध) यांची तर चपराक साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
देशभरातील एकूण मुद्रित माध्यमांतील नियतकालिकांच्या सुमारे 15 टक्के नियतकालिके मराठी भाषेत आहेत. शिवाय शंभरहून अधिक वर्षांची दिवाळी विशेषांकांची परंपरा केवळ याच भाषेने समृद्धपणे जपली आहे. मात्र गेल्या काही वर्षात मराठी भाषेतील नियतकालिकांसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठी भाषेतील नियतकालिकांची परिस्थिती आणखी समृद्ध व्हावी याकरिता अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेची स्थापन करण्यात आली आहे.
संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ. देशपांडे हे गेली 34 वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता सन्मानासह वीसहून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सहकार भारती या अखिल भारतीय संस्थेशी संबंधित श्री. कुलकर्णी हे सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा सहकार सुगंध मासिकाचे संपादक आहेत तर आपल्या चपराक या साप्ताहिकाबरोबरच सुमारे दीडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केलेल्या प्रकाशन संस्थेचे संचालक म्हणून श्री. पाटील हे जबाबदारी सांभाळतात.
सूर्यकांत पाठक (ग्राहकहित), अमित वाडेकर (वनराई), आनंद अवधानी (अनुभव), अभय कुलकर्णी (माहेर व मेनका), सुनील गायकवाड (वेदांतश्री), विनोद शिरसाठ (साधना), पी. जी. शर्मा (व्यापारी मित्र) यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य नियतकालिकांच्या मालक-संपादकांनी या संघटनेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी सहयोग देण्याचे ठरवले आहे.

यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दिवाळी अंकांची वितरण व विक्री व्यवस्था अधिक ठिकाणी करण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे. याकरिता नियतकालिकांच्या दिवाळी अंकांच्या संपादक, प्रकाशकांनी संघटना पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: