भारताने ५० लाखांचा टप्पा ओलांडला! २४ तासांत ९० हजार १२३ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोना परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत आहे. जगभरात सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत देश दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारताने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी दिवसभरात ९० हजार १२३ नव्या रुग्णांसह भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० वर पोहोचली. तर एका दिवसात १ हजार २९० रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ८२ हजार ६६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत ३९ लाख ४२ हजार ३६१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या ९ लाख ९५ हजार ९३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारपर्यंत देशात ५ कोटी ८३ लाख १२ हजार २७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. महाराष्ट्राने सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत रशियालाही मागे टाकले. जागतिक रुग्ण संख्येत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. सोमवारी रशियाची एकूण रुग्ण संख्या १० लाख ७३ हजार ८४९ इतकी होती. तर महाराष्ट्राची रुग्ण संख्या सोमवारी १० लाख ७७ हजार ३७४ इतकी झाली. त्यामुळे चिंता आता अधिकच वाढली आहे.