Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ॲन्टीजेन चाचण्यांवर भर द्यावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढविण्यात यावे. जिल्ह्यासाठी चार अंकी हेल्पलाईन क्रमांक निर्माण करावा. जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेतला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोरोना उपाययोजनांसंदर्भात विविध बाबींचा तसेच मागण्यांचा उहापोह केला. त्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, १५ सप्टेंबर पासून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू होत आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. चंद्रपूर जिल्ह्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता असून हे प्रमाण १५ ते २० पर्यंत वाढवावे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नवीन यंत्रसामग्री देण्यात येत असून, येणाऱ्या कालावधीत ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांसाठी नवीन लॅब सुरू होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा करून तातडीने लॅब सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

समाज आरोग्य अधिकारी पदासाठी परीक्षा घेण्याचे काम सुरू असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ५० डॉक्टरांची सेवा घेण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. रूग्णवाहिकेसंदर्भात तक्रार येता कामा नये. खाजगी रूग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी जिल्ह्यामध्ये टास्कफोर्स स्थापन करण्याच्या सूचना देतानाच, जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड आणि हेल्पलाईन सुरू करावी. तसेच गंभीर रूग्णांसाठी टेलीआयसीयू सुविधेच्या माध्यमातून उपचार करण्याच्या सुचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading