एकपडदा चित्रपटगृहे बंद करू द्या
पूना एक्झिबिटर्स असोसिएशनची शासनाकडे मागणी
पुणे : करोनामुळे सहा महिन्यांपासून शहरातील एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत. उघडण्यास कधी परवानगी मिळणार याबाबत शाश्वती नाही. उघडलीच तर प्रेषक येतील की नाही, हे सांगणेही कठीण आहे. त्यातच ओटीटीमुळे प्रेषकांची करमणुकीची सोय झाली आहे. लोकांच्या मनात कोरोनाच्या भितीने घर केले आहे. त्यामुळे ते चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार नाहीत. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक पडदा चित्रपटगृहे बंद करून त्याजागेत दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अशी मागणी पूना एक्झिबिटर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.
मागील काही वर्षांपासून एक पडदा चित्रपटगृह तोट्यात चालत आहेत. त्यामुळे चित्रपटगृह चालकांसोमर दिवसेंदिवस आर्थिक अडचणी वाढत आहेत. म्हणूनच या आधीही वेळोवेळी या संघटनेने शासनाकडे चित्रपटगृह बंद करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवले आहे. एकपडदा चित्रपटगृहे आणि व्यावसायिक व कर्मचारी यांच्या दयनीय अवस्थेला या पत्रातून वाचा फोडण्यात आली आहे.
करोनामुळे सुमारे सहा महिने बंद असलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू करून तग धरणे अशक्य आहे. करोनाच्या संकटामुळे चित्रपटगृह व्यावसायिकांवर आभाळ कोसळले आहे. सर्व चित्रपटगृह व्यावसायिक अर्धपोटी राहण्यापेक्षा, काही चित्रपटगृह बंद करून, तेथे अन्य व्यवसाय केल्यास उरलेल्यांचे पोट भरेल. एक पडदा चित्रपटगृहांसाठी व्यवसाय बदल करण्याची परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोहोळ यांनी केली आहे.
देशातील चित्रपट निर्मितीची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात थिएटर व्यवसायाला राजाश्रय मिळत नाही. ब्रिटिश राज्यात 1923 मध्ये लागू झालेल्या करमणूक कराद्वारे सरकारला 97 वर्षे भरपूर उत्पन्न मिळाले. तरी या व्यवसायाला सापत्न वागणूक दिली जात असल्याची खंत मोहोळ यांनी व्यक्त केली.
18 चित्रपटगृहे बंद पडली
सन 1993 मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये 34 चित्रपटगृहे होती. त्यातील 18 चित्रपटगृहे बंद पडली आहेत. तेथे अन्य व्यवसाय करण्याची परवानगी नसल्याने सर्व वास्तू पडीक आहेत. या जागेचा ना मालकाला फायदा, ना समाजाला उपयोग, ना सरकारला उत्पन्न अशी परिस्थिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बहुपडदा चित्रपटगृहांमुळे 150 पडदे उपलब्ध झालेले आहेत. राज्य सरकारने मल्टिप्लेक्स व्यवसायाला प्रोत्साहन देताना एकपडदा चित्रपटगृहांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
