fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पुणे शहर पोलीस दल कल्याण साठी उद्योगपती विजय पुसाळकर यांच्याकडून ५० लाखांची मदत

पुणे : कोविड-१९ महारोगाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणा-या पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील उद्योगपती व इंडो शॉट्ले आॅटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी.पुसाळकर यांनी ५० लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलीस दल कल्याण साठी दिला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हाणे, पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र्र शिसवे, पुणे शहर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे, पोलीस आयुक्त – पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पोर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. कोविड सुरक्षा नियमांचे संपूर्ण पालन करत हा धनादेश हस्तांतरणाचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला.
विजय बी. पुसाळकर म्हणाले,  देशामध्ये कोविड-१९ या महामारीने न-भुतो न-भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा अवघड आणि कठीण प्रसंगातही पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. आपले जीव धोक्यात येत असतानाही त्यांनी बजावलेली चोख कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या याच धैर्य आणि शौर्य कायार्साठी आमच्यातर्फे ही छोटीशी मदत करत आहे. निधीसोबतच पोलीस दलातील पाच मुलींच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या ट्रस्ट तर्फे घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सुबोधकुमार जायसवाल म्हणाले, करोना महामारीच्या काळामध्ये पोलीस दलाने विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात पोलीस दलाने कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारी देखील बजावली.
डॉ. के. व्यंकटेशम् म्हणाले, समाजातील सजग नागरिक हा सुध्दा एक पोलीसच असतो. विविध सामाजिक आपत्तींमध्ये पोलीस दल सर्तक राहून नागरिकांचे रक्षण करत असतात. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणा-या उद्योगपतींकडून पोलीस दलाला मिळलेल्या या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी जो निधी दिला आहे त्याचा पोलीस दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल.
विजय पुसाळकर यांना पोलीस दलाच्यावतीने राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. अशोक मोराळे यांनी प्रास्ताविक केले. मितेश घट्टे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.रवींद्र शिसवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading