कोरोना संकटात शिक्षकांचा पुढाकार कौतुकास्पद – प्रा. डॉ. संजय चोरडिया
पुणे : “कोरोना महामारीच्या संकटाकडे संधी म्हणून पाहत शिक्षकांनी नवतंत्रज्ञान अवगत करून ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य चांगले राहावे, शिक्षणात खंड पडू नये म्हणून सर्वच शिक्षक ऑनलाईन, ई-लर्निंग स्वरूपाकडे वळले आहे. अद्ययावत शिक्षणप्रणाली आत्मसात करून ऍनिमेशन, अप्लिकेशन, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ज्ञानदानाचा यज्ञ थांबता कामा नये, ही प्रेरणा थोर तत्वज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचीच प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.
यावेळी मुख्य विकास अधिकारी डॉ. एस. रामचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासांडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, कार्यकारी संचालक प्रा. अक्षित कुशल, प्रा. सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.
पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षक दिवस साजरा होतो. त्यानिमित्ताने सूर्यदत्ता गृपमध्येही विद्यार्थी व शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राधाकृष्णन हे एक तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. विविध विद्यापीठात शिकवत होते. तामिळनाडूच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राधाकृष्णन यांनी आयुष्यभर आपल्या ज्ञानदानातून अनेक विद्यार्थी घडवले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “शिक्षण क्षेत्रासह जगभरातील सर्वच क्षेत्रांना कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. मात्र, याही परिस्थितीत भारतीय शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. डिजिटायझेशन स्वीकारत शिकवण्याची पद्धती बदलली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, निर्णयक्षमता, भावनिक, अध्यात्मिक ज्ञान, तंत्रकौशल्य, कारणमीमांसा, नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिक्षक सर्वतोपरी मेहनत घेत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा जपत विद्यार्थ्यांना उद्योजकता, स्वावलंबनाचे धडे देतानाच त्यांच्यात मानवतेची बीजे रुजविण्याचे काम शिक्षक करत आहेत. जागतिक स्पर्धेत भारतीय विद्यार्थी टिकून राहावेत, यासाठी केंद्र सरकारने आणलेले नवे शैक्षणिक धोरण समजून घेत त्यानुसार विविध कौशल्ये, प्रगतीचे मूल्यमापन करण्याचे प्रमाण, टिचिंग, लर्निंग आदी गोष्टी शिक्षक आत्मसात करताहेत.”
“जो आपल्याला माहिती देतो तो अध्यापक, माहितीसह ज्ञान देतो तो उपाध्याय, कौशल्य शिकवतो तो आचार्य, सखोल ज्ञान देणारा पंडित, प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान देऊन दिशा देतो तो द्रष्टा, तर जो आपले अंधकारमय जीवन प्रकाशमान करतो तो गुरु असतो. सूर्यदत्ता शिक्षण संस्थेने हेच जपत नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. काळाची योग्य पावले ओळखत तंत्रकुशल शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने ज्ञानदान करत असतो. गेल्या चारपाच महिन्यांतील स्थितीशी जुळवून घेत आमच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिलेला नाही. विविध तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि उपकरणाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याचे महान कार्य सूर्यदत्ता संस्थेतील शिक्षकांनी केले आहे. यापुढेही शिकवण्याच्या या नव्या पद्धती आत्मसात करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सुरु राहील,” असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
