Wednesday, June 17, 2026
PUNE

कोरोनामुळे शहरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी -आबा बागुल 

पुणे, दि. ८ – गेल्या ४ महिन्यांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहराच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय सादक बादक चर्चाकरून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण फक्त महापौरांशी चर्चा करून वेगवेगळे निर्णय घेता त्यास आम्ही सर्व पक्ष समर्थन देत आलेलो आहोत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो वाढत असताना कोणत्याही पक्षाची अधिकृत बैठक घेऊन आपण अजून चर्चा केलेली नाही. ऑनरेकॉर्ड चर्चा न केल्याने उद्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याची सर्व जबाबदारी आपली व खात्याची राहील. यासाठी आपण तातडीने पक्षनेत्यांची दर चार दिवसांनी अधिकृत बैठक घ्यावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली.
ते म्हणाले पुणे शहराच्या हितासाठी कामकाजाच्या वेळेप्रमाणे सर्व पक्षनेते आपला वेळ देण्यास तयार असून त्यांची अधिकृत बैठक घेऊन त्याचे मिनिट्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशी बैठक होत नसल्याने विरोधी पक्षांकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठोस मुद्दे व काही सूचना असतात. ते मुद्दे व सूचनांची आयुक्तांशी अनधिकृतपणे चर्चा होते .परंतु अनधिकृतपणे केलेल्या चर्चेला काहीही महत्व नसते . अधिकृतरीत्या त्याचा अजेंडा काढून त्याचे अधिकृत मिनिट्स नोंद करून निर्णय घेणे हे सभा कामकाज नियमावली व महाराष्ट्र म्युनसिपल ऍक्ट नुसार बंधनकारक आहे. नगरसचिवांनी कार्यपत्रिका जाहीर करून हे विषय अजेंड्यावर घेऊन त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे असते. महानगरपालिका आयुक्त नवीन असल्याने त्यांना कामकाजाची माहिती होण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो. परंतु तत्कालीन आयुक्तांप्रमाणे ते देखील अशी मिटिंग घेत नाही हे योग्य नाही. पुणे शहराच्या हितासाठी आयुक्तांकडून चांगले निर्णय अपेक्षित असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शासन स्तरावर शासनाच्या बैठकी होतात त्या महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर नसतात. शासनाने घेतलेल्या बैठकांचे मिनिट्स त्यांच्या रेकॉर्डला असतात. शासनाच्या बैठका ह्या विभागीय आयुक्त व जिल्हाधीकाऱ्यांच्या अखत्यारीत असतात. त्याचा महानगरपालिकेच्या अजेंड्याशी काहीही संबंध नसतो. पक्ष नेत्यांच्या बैठकी आपल्या समक्ष सर्व अधिकाऱ्यांसह होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यसभा होत नसल्याने अन्य सभासदांना कशाचाही थांगपत्ता लागत नाही.त्यामुळे पक्ष नेत्यांची कोरोना बाबतीत बैठक घेणे अत्यंत गरजेचे आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनप्रमाणे पुणे शहरात ४३३५ डॉक्टर आहेत.एवढे डॉक्टर असूनही आपला समन्वय बरोबर नसल्यामुळे सर्व डॉक्टर दिवसेंदिवस काम करताना दिसत नाहीत. शहरात कोरोना रुग्णांसाठी ५००० बेडची क्षमता आहे. व ४३३५ डॉक्टर असताना शहरात कोरोनामुळे एकही नागरिकाचा बळी गेला नव्हता पाहिजे. परंतु शहरात एवढे डॉक्टर असताना चुकीच्या व्यवस्थापनामुळे नागरिकांचे कोरोनाने मृत्यू होत आहे ही गंभीर बाब आहे. याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी देखील पक्षनेत्यांच्या बैठकी होणे गरजेचे आहे. असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading