येत्या २१ जुन रोजी ‘अमृत वर्षा’ शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने येत्या रविवारी दि. २१ जून रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ‘अमृत वर्षा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम लॉ कॉलेज रस्त्यावरील, दामले सभागृहात संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश उपलब्ध होईल.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. महेश कुलकर्णी यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी वर निलय साळवी हे साथ करतील.
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन ही संस्था प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. आपल्या सांगीतिक क्षेत्रातील कामासाठी संस्थेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत आपल्या संगीताचा समृद्ध वारसा पोहोचावा यासाठी प्रयत्नशील असते. गेल्या काही वर्षांत संस्थेच्या वतीने अनेक यशस्वी अशा सांगीतिक मैफलींचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
